सातारा / प्रतिनिधी :
द्रेशद्रोह्यांशी संबंध ठेवणाऱ्या नबाब मलिकांचा निषेध असो, नबाब मलिक मुर्दाबाद, नबाब मलिक राजीनामा द्या, अशा जोरदार घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपाच्यावतीने जोरदारपणे मंत्री नबाब मलिक यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ जात असताना त्यांना पोलिसांनी रोखल्याने पोलीस अन् कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक खडाजंगी झाली.
राज्यभर पुकारण्यात आलेल्या भाजपाच्या आंदोलनामुळे सातारा पोलीस यंत्रणा अलर्ट झाली होती. त्यांनी भाजपाच्या मोर्चाला परवानगी नाकारली. त्यामुळे जिह्याच्या कानाकोपऱयातून आलेले भाजपाचे मोजकेच कार्यकर्ते आक्रमक झाले. बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्यासह पोलीस मुख्यालय, शाहुपूरी, तालुका पोलीस ठाणे, बोरगाव या पोलीस ठाण्यातील मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मोर्चाला मनाई केल्याची बाब निदर्शनास येताच कार्यकर्त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमत आंदोलन केले. यामध्ये जोरदारपणे घोषणा देत कार्यकर्त्यांनी मंत्री नबाब यांच्या प्रतिकात्मक पुतळय़ास जोडे मारत निषेध नोंदवला. महिला कार्यकर्त्यांनी जोरदारपणे हा निषेध व्यक्त करत आपला राग नबाब मलिक यांच्या प्रतिमेवर काढला. निवेदन देण्याकरता शिष्टमंडळ आतमध्ये जात असताना पोलिसांनी आडकाठी करताच कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात शाब्दीक चकमक झाली.
या आंदोलनात भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. सुरभी भोसले, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, विट्ठल बलशेठवार, शिवाजीराव शिंदे आदी सहभागी झाले होते.