ऑनलाईन टीम / सातारा :
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत जावली तालुका सोसायटी मतदारसंघातून आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक ज्ञानदेव रांजणे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव केला. शिंदे यांचा हा पराभव जिव्हारी लागल्याने शिंदे समर्थकांनी साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केली.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्याचे काम शशिकांत शिंदे यांनी केले, हे रुचत नसल्यानेच जिह्यातील नेत्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश डावलून शिंदे यांचा पराभव केल्याची भावना शिंदे समर्थकांमध्ये आहे. त्यामुळे संतापलेल्या 15 ते 20 कार्यकर्त्यांनी याचा निषेध व्यक्त करत राष्ट्रवादी कार्यालयावर जोरदार दगडफेक केली.
दरम्यान, दगडफेकीच्या या घटनेनंतर शशिकांत शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, कार्यकर्त्यांनी भावनेच्या भरात हे कृत्य केले. हे योग्य नाही. मी या प्रकाराबद्दल सर्वांची माफी मागतो. माझ्यासाठी कार्यकर्त्यांनी अशा प्रकारची भूमिका घेऊ नये.