सातारा शहरात सीसीटीव्ही बसवण्याचे काम युध्दपातळीवर
प्रतिनिधी / सातारा
सातारा शहरासह परिसरात गुन्हेगारीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी अद्यावत सीसीटीव्ही कॅमेऱयांचीही आवश्यकता होती. त्याबाबत पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या पाठपुराव्यामुळे मिळालेल्या निधीतून शहरासाठी चांगल्या दर्जाचे 32 सीसीटीव्ही कॅमेऱयांची खरेदी करण्यात आली आहे. सध्या शहरभर ते सीसीटीव्ही बसवण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असल्याची माहिती पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी दिली.
शहर व परिसरात चेन स्नेचिंग, घरफोडी, सार्वजनिक ठिकाणी गर्दी, मारामारीसह जबरी चोऱयांचे गुन्हे वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाय योजना म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत प्रशासनाकडे प्रस्ताव दिला होता. त्याला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला असून साताऱयावर करडी नजर ठेवण्यासाठी आता अत्यंत चांगल्या दर्जाचे अद्यावत 32 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरु करण्यात आल्याचे बंसल यांनी सांगितले.
शहरातील सर्व मुख्य चौक, सातारा बसस्थानक, सेव्हनस्टारसमोरील राधिका रस्ता चौक, पोवईनाका, ग्रेडसेपरेटर, अजंठा चौक, वाढे फाटा, बाँबे रेस्टारंट, मोळाचा ओढा, राजवाडा, समर्थ मंदिर, बोगदा, शाहू चौक, मोती चौक, बुधवार नाका, सदरबझार परिसर, विसावा नाका, गोडोली साई मंदिर यांच्यासह सर्व मुख्य चौकात सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरु करण्यात आले असून येत्या 15 दिवसात हे काम पूर्णत्वास जाईल, असेही बंसल यांनी सांगितले.
भविष्यात जिल्हय़ात सर्वत्र सीसीटीव्ही
मुख्यतः पर्यटन स्थळे तसेच जिल्हय़ातील सर्व मोठय़ा शहरांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे प्रस्तावित आहे. आता सातारा शहरात 32 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत असून दुसऱया टप्प्यात आणखी 50 ते 60 सीसीटीव्ही कॅमेरे बसवून शहरातील उपनगरांसह उर्वरित भागही कव्हर करण्यात येणार आहे. तसेच मोठय़ा गावांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी त्या त्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.
24 तास राहणार करडी नजर
या सर्व सीसीटीव्हींचा कंट्रोल पोलीस मुख्यालयात राहणार असून त्यासाठी तिथे मोठय़ा स्क्रीनसह अद्यावत यंत्रणा उभारण्याचे काम सुरु आहे. हे सीसीटीव्ही बसवण्यात आल्यानंतर शहरातील सर्व घडामोडींचा वेध मुख्यालयात बसून कळणार असून त्यानुसार तातडीने कारवाई करण्यासाठी बीट मार्शल, पेट्रोलिंग व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी निश्चितपणे चांगले यश मिळणार आहे. गुन्हेगारी सीसीटीव्हीत कैद होणार असून सातारा शहरात आता 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱयांची करडी नजर असणार आहे.