महांतेशनगर परिसरात गुन्हेगारांचा उच्छाद, घरांसमोर उभी करण्यात आलेली वाहने लक्ष्य
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांत चोऱया, घरफोडय़ा वाढल्या आहेत. गुन्हेगारांनी पोलीस दलासमोर आव्हान उभे केले आहे. आता घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांना लक्ष्य बनविण्यात आले असून कारच्या काचा फोडून डिजिटल स्क्रीन पळविण्यात आले आहेत. महांतेशनगर परिसरात एका रात्रीत 7 वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.
शुक्रवारी मध्यरात्रीनंतर या घटना घडल्या आहेत. महांतेशनगर, महांतभवन परिसरात घरांसमोर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. अंजनेयनगर परिसरातही गुन्हेगारांनी धुडगूस घातला आहे. एकूण सात वाहनांच्या काचा फोडून डिजिटल स्क्रीन पळविले आहेत. शनिवारी सकाळी या घटना उघडकीस आल्या.
महांतेशनगर, अंजनेयनगर, अशोकनगर परिसरात एकच खळबळ माजली आहे. यासंबंधी शनिवारी बसवराज पडीगौडा पाटील यांनी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शुक्रवारी मध्यरात्री 2 नंतर या घटना घडल्या आहेत.
गुन्हेगारांनी 2 इनोव्हा, आय-20, होंडाअमेज, सिलेरो, स्कॉर्पिओ, होंडा इलाईट आदी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. गुन्हेगारांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. माळमारुती परिसरातील सात वाहनांच्या काचा फोडून डिजिटल स्क्रीन पळविल्याच्या घटना लक्षात घेता बेळगावात रात्रीची गस्त सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यापूर्वी समाजात दहशत माजविण्यासाठी घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांच्या काचा फोडण्याचे प्रकार घडत होते. आता वाहनांच्या काचा फोडून डिजिटल स्क्रीन डिस्पले व इतर साहित्य पळविण्यात आले आहे. माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात तर गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची घरे, वाहने किती सुरक्षित आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.