तरूण भारत संवाद कुर्डुवाडी / प्रतिनिधी होमक्वारंटाईन केलेले असताना सुद्धा समाजात फिरत असलेले पापनस येथील दोघे, म्हैसगाव येथील एक महिला यांच्या विरुद्ध तर कुर्डू येथे बांधकाम सुरु असलेल्या जागी मास्क न वापरता सुरक्षित अंतर न पाळणारे चार असे सात जणांविरुद्ध कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हैसगाव चे पोलीस पाटील हनुमंत चांदणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार होमक्वारंटाईन केलेली महिला बुधवार रोजी संध्याकाळी ५ वाजता मास्क न घालता, सुरक्षित अंतर न ठेवता समाजात फिरताना दिसुन आली. सदर महिलेचे चंदननगर ( पुणे) येथे २५ दिवस वास्तव्य होते. पापनस येथे होम क्वारंटाईन केलेले दोघे बुधवारी दुपारी ३ वाजता समाजात इतरत्र फिरताना दिसल्याने पोलिस पाटील कल्याण पाटील यांनी फिर्याद दिली आहे. या दोघांपैकी एकजण दहिसर(मुंबई) येथे ४ दिवस वास्तव्य करुन आला आहे. दुसरा व्यक्ती सोलापूर येथे १५ दिवस राहुन आला आहे. या दोघांनाही बाह्यरुग्ण धर्तीवर तपासल्यानंतर होम क्वारंटाईन करण्यात आले होते. परंतू हे दोघेही मास्क न लावता, ग्लोव्ह्ज न घालता समाजात फिरले असलाचे दिसुन आले.
कुर्डू येथे बुधवारी दुपारी १ वाजता चार जण बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मास्क न लावता सुरक्षित अंतर न ठेवता काम करत होते. या प्रकरणी कॉन्स्टेबल नितिन गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मालक संजय सोनमुखे, अमोल सोनमुखे, मिस्त्री कैलास भांगे, ज्ञानदेव शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.