कोल्ह्यापूर : हरिप्रिया एक्सप्रेस सात महिन्यानंतर कोल्ह्यापुरात दाखल झाली. शुक्रवारी सकाळी ती 11 प्रवाशांना घेऊन ती तिरूपतीला रवाना झाली
प्रतिनिधी / कोल्हापूर
तब्बल सात महिन्यांनंतर कोल्हापुरात हरिप्रिया एक्स्प्रेस दाखल झाली, शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता रेल्वे स्टेशनवरून 11 प्रवाशांना घेऊन ती तिरूपतीला रवाना झाली. कोरोना प्रतिबंधामुळे तिरूपती दर्शनाच्या प्रतिक्षेत असलेले 155 प्रवासी या एक्स्प्रेसद्वारे तिरूपतीला पोहोचणार आहेत. तिरूपती एक्स्प्रेस सुरू झाल्याने हळूहळू रेल्वे स्टेशनवर भाविकांची गर्दी वाढण्यास मदत होणार आहे.
लॉकडाऊनमुळे मार्चपासून रेल्वेसेवाही बंद होती. 28 फेब्रुवारीला प्रवाशांना घेऊन हरिप्रिया एक्स्प्रेस तिरूपतीला रवाना झाली होती. त्यानंतर सात महिन्यांनी रेल्वेसेवा सुरू झाली. आता दीपावलीचे औचित्य साधत तिरूपतीला जाण्यासाठी हरिप्रिया एक्सप्रेस रेल्वेने सुरु केली आहे. गुरूवारी तिरूपती येथून कोल्हापूरकडे हरिप्रिया एक्स्प्रेस रवाना झाली, पण हातकणंगले येथे इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ती दिड तास उशिरा पोहचली. यातून केवळ दोघेच येथील शाहू छत्रपती टर्मिनन्सवर उतरले. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता शहरातील 11 प्रवाशांना घेऊन हरिप्रिया एक्स्प्रेस तिरुपतीकडे रवाना झाली. हरिप्रिया एक्स्प्रेससाठी 155 जणांनी आगाऊ आरक्षण नोंद पेले आहे. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर सात महिन्यांनी ही रेल्वे तिरुपतीला रवाना झाली आहे. तिरूपती एक्स्प्रेसच्या दरात 100 ते 150 रूपयांनी वाढ झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
दरम्यान, अंबाबाई मंदिर बंद असल्याने हरिप्रिया एक्स्प्रेसला भाविकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. पण तिरूपती येथील मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले झाल्याने जिल्ह्यातून तिरूपतीला जाणाऱया भाविकांची संख्या हळूहळू वाढणार आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत तिरूपती एक्स्प्रेस सुरु राहणार आहे. अंबाबाई मंदिर दिवाळीनंतर दर्शनासाठी खुले झाल्यास या एक्स्प्रेसला भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.