वृत्तसंस्था/ कोलकाता
सात महिन्यापूर्वीच मोहन बगान फुटबॉल क्लबला आय लीग फुटबॉल स्पर्धेतील विजेता म्हणून घोषित करण्यात आले होते पण त्यांना बक्षीसादाखल ठेवण्यात आलेला करंडक मिळाला नव्हता. रविवारी येथे झालेल्या या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात मोहन बगान संघाला मान्यवरांच्या हस्ते आय लीग फुटबॉल करंडक प्रदान करण्यात आला.
माजी विजेत्या ऐझवाल एफसी संघाला 1-0 अशा गोलफरकाने पराभूत करून 10 मार्च रोजी मोहन बगान संघाने आय लीग फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारी संकटाला प्रारंभ झाल्याने या स्पर्धेतील शेवटच्या चार फेऱया बाकी असताना सदर स्पर्धा रद्द करावी लागली. कोरोना परिस्थितीमुळे देशातील 2020 च्या फुटबॉल हंगामात मोठा अडथळा निर्माण झाला. त्यामुळे आय लीग स्पर्धेतील विजेत्या संघाला चषक देण्यासाठी विलंब झाल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले.
रविवारी आयोजित केलेल्या बक्षीस वितरण समारंभावेळी आय लीग स्पर्धेचे सीईओ सुनांदो थर यांच्याहस्ते मोहन बगान संघातील काही खेळाडूकडे आय लीग चषक प्रदान करण्यात आला त्यावेळी मोहन बगान संघाचे अध्यक्ष बोस आणि पश्चिम बंगाल शासनाचे क्रीडामंत्री अरूप विश्वास उपस्थित होते. मात्र या समारंभाला मोहन बगान संघाचे प्रमुख प्रशिक्षक व्हिकुना आणि साहाय्यक प्रशिक्षक रंजन चौधरी उपस्थित नव्हते. व्हिकुना यांनी बगान संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते आता केरळ ब्लास्टर्स संघाचे प्रमुख प्रशिक्षक आहेत. आता मोहन बगानचा संघ इंडियन सुपर लीगमध्ये अधिकृतपणे दाखल झाला आहे. या समारंभानंतर खुल्या वाहनातून बगानच्या समर्थकांनी विजयी मिरवणूक काढली. या मिरवणुकीमध्ये हजारो फुटबॉल शौकिन सहभागी झाले होते