वृत्तसंस्था / होबार्ट :
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने पुनरागमनातील विजयी घोडदौड पुढे चालू ठेवताना येथे सुरू असलेल्या होबार्ट इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
या स्पर्धेत युक्रेनच्या नादिया किचेनॉकसमवेत ती खेळत असून उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सानिया-नादिया जोडीने अमेरिकेच्या व्हानिया किंग व ख्रिस्तिना मॅकहेल यांच्यावर 6-2, 4-6, 10-4 अशी मात केली. पाचवे मानांकन मिळालेल्या सानिया-नादिया यांनी पहिला सेट जिंकून आघाडी घेतली होती. पण अमेरिकन जोडीने दुसरा सेट जिंकून सामना टायब्रेकरवर नेला. या सेटमध्ये सानिया-नादिया यांनी पूर्ण वर्चस्व राखत टायब्रेकसह सामना जिंकून आगेकूच केली. त्यांची उपांत्य लढत स्लोव्हेनिया व झेकच्या टॅमारा झिडान्सेक व मेरी बुझकोव्हा यांच्याशी होणार आहे. 33 वर्षीय सानियाने 2017 मधील ऑक्टोबरमध्ये झालेल्या चायना ओपन स्पर्धेत शेवटचे खेळली होती.