नवी दिल्ली
: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झानेही कोरोनाविरुद्धच्या लढतीसाठी 1.25 कोटीचा निधी जमा केला आहे.
‘गरजू लोकांच्या मदतीसाठी गेल्या आठवडय़ात आम्ही प्रयत्न केले होते. हजारो कुटुंबीयांना आम्ही अन्नपुरवठा केला आणि एका आठवडय़ात सव्वा कोटीचा निधीही संकलित केला आहे. या निधीचा सुमारे एक लाख लोकांना फायदा होणार आहे. भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी सध्या सर्वांनीच मदतीचा हात पुढे केला असून आम्हीही त्यात सहभागी झालो आहोत,’ असे सानियाने ट्विटर संदेशात म्हटले आहे. जगभरातील अनेक देश सध्या कोरोना व्हायरसविरुद्ध लढा देत आहेत. भारतातील अनेक क्रीडापटू मदतीसाठी पुढे आले असून त्यांनी आर्थिक मदतही केली आहे. गेल्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीए-केअर्स फंडाची स्थापना केली असून देशवासियांना त्यांनी या फंडात यथाशक्ती आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले होते. क्रिकेटपटू सुरेश रैना, सचिन तेंडुलकर, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, धावपटू हिमा दास, बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, मल्ल बजरंग पुनिया व राहुल आवारे यांनीही याआधी आर्थिक मदत केली आहे.