वृत्तसंस्था/ दोहा
सुमारे वर्षभरानंतर पहिल्याच स्पर्धेत खेळणाऱया भारताच्या सानिया मिर्झाला पराभवाला सामोरे जावे लागले. येथे सुरू असलेल्या कतार टोटल ओपन टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा व तिची स्लोव्हेनियाची साथीदार आंदेया क्लेपॅक यांना महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले.
सानिया-क्लेपॅक यांना अमेरिकेची निकोल मेलिशर व हॉलंडची डेमी श्कूर्स यांच्याकडून दीड तासांच्या खेळात 5-7, 6-2, 5-10 असा पराभव स्वीकारावा लागला. सानिया व क्लेपॅक यांना 10000 डॉलर्स विभागून व प्रत्येकी 185 मानांकन गुण मिळाले. सानियाकडे फारसे मानांकन गुण नसल्याने तिला याचा क्रमवारीत सुधारणा होण्यासाठी उपयोग होणार आहे. सध्या ती 254 व्या स्थानावर असून पुढील आठवडय़ात ती 177 व्या स्थानावर पोहोचणार आहे.