वृत्तसंस्था/ ऍडलेड
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झा तसेच रामकुमार रामनाथन व रोहन बोपण्णा यांनी दुहेरीतील आपले सामने जिंकून पुढील फेरीत प्रवेश मिळविला आहे.
महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात सानिया मिर्झा आणि युक्रेनची किचेनॉक यांनी डाब्रोव्हस्की आणि ओलमॉस यांचा 1-6, 6-3, 10-8 असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. पुरूष दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात रामकुमार रामनाथन आणि रोहन बोपण्णा या भारतीय जोडीने ब्राझीलचा फर्नांडो रॉम्बोली आणि अमेरिकेचा सेरेटनी यांचा 6-2, 6-1 असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला आहे. एटीपी टूरवरील स्पर्धेत प्रथमच रामकुमार आणि बोपण्णा दुहेरीत एकत्रित खेळत आहेत.