वडगाव येथील प्रकार, महिलेचे कौतुक
प्रतिनिधी/ बेळगाव
हरवलेले सौभाग्यालंकार परत मिळाल्यानंतर सौभाग्यवतीला होणारा आनंद काय असतो याची प्रचिती शुक्रवारी वडगाव येथे आली. शांतीनगर परिसरात राहणाऱया सौम्य पवन बुदीहाळ या महिलेचे दोन दिवसांपुर्वी हरवलेले मंगळसूत्र परत करण्यात आले आहेत.
वडगाव येथील बांधकाम व्यवसायिक अनंत पाटील व त्यांची पत्नी रोहिणी या गोमटेश विद्यापीठाजवळ रस्त्यावरुन जात असताना त्यांना एक मंगळसूत्र सापडले. त्यांनी तो ताब्यात घेऊन कोणी तरी हा दागिना शोधतो आहे का? हे पाहिले. मात्र त्यांना कोणीच दिसले नाही. त्यानंतर या दांपत्याने परिसरातील काही दुकानदारांना याची कल्पाना दिली.
कोणीतरी आपले मंगळसूत्र शोधण्यासाठी या परिसरात आले तर आमच्याशी संपर्क साधा, असे सांगून हे दांपत्य तेथून निघून गेले. दुकानदारांना त्यांनी आपला मोबाईल क्रमांकही दिला होता. ही घटना बुधवारची. गुरुवारी एक महिला त्या भागात मंगळसूत्र शोधत होती. परिसरातील दुकानदारांनी तिला अनंत पाटील कुटुंबियांचा क्रमांक दिला.
सौम्या बुदिहाळ यांनी तातडीने पाटील कुटुंबियांशी संपर्क साधून आपले मंगळसूत्र हरवले आहे. तुम्हाला मिळाल्यास परत करावे, अशी विनंती केली. हरवलेल्या वस्तुची खात्री करुन द्या आणि ते घेवून जा, असे सांगताच सौम्या आपले पती व वडिलांसमवेत तेथे पोहोचले. खात्री पटल्यानंतर पाटील कुटुंबियांनी त्यांना मंगळसूत्र परत केले. यावेळी रोहिणी पाटील, अनंतराव पाटील, गजानन पाटील, वसंतराव नाईक आदी उपस्थित होते.