प्रतिनिधी/ बेळगाव:
बेळगावच्या रोनित गजानन मोरेच्या भेदक व अचुक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली येथील कर्नल सिंग स्टेडियमवर झालेल्या रेल्वे विरूध्दच्या रणजी सामन्यात कर्नाटक संघाने 10 गडय़ांनी विजय मिळवत बोनस गुणही पटकाविला.
रेल्वेचा पहिला डाव 182 धावावर गुंडाळल्यानतंर कर्नाटक संघाने आपल्या डावात 211 धावा करत 29 धावांची तिसऱया दिवशी भर घातली. खराब हवामानामुळे प्रत्येक दिवशी बरीचशी षटके वाया गेल्यानंतरही विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या कर्नाटक संघाने सामन्याच्या शेवटच्या दिवशी रेल्वे संघाचा 79 धावात खुर्दा केला.
कर्नाटकाच्या आणि बेळगावनगरीचा सुपूत्र रणजीपटू रोनित गजानन मोरेंने अचुक टप्प्यावर भेदक गोलंदाजी करत रेल्वे संघाच्या फलंदाजाचा कणा मोडताना आपल्या 11 षटकात 32 धावांच्या मोबदल्यात 6 गडी टिपले. रेल्वेचा निम्मा संघ रोनित मोरे तंबुत पाठविला. रोनित मोरेला मोलाची साथ देताना जलद गती गोलंदाज अभिमन्यू मिथूनने 17 धावात 3 गडी बाद केले तर प्रतिक जैनने 1 गडी बाद केला. रेंल्वे संघातर्फे मृणाल देवधरने 38 धावा केल्या. देवधर व्यतीरिक्त एकही फलंदाजाला दुहेरी धाव संख्या गाठता आली नाही.
पहिल्या डावात रोनित गजानन मोरे यांने 1 बळी घेतला होता. 51 धावांचे आव्हान घेऊन फलंदाजीस उतरलेल्या कर्नाटक संघाने 8.2 षटकातच बिनबाद विजयाचे उद्दिष्ट गाठले. बेळगावच्या आणखीन एक सुपुत्र रोहन प्रमोद कदमने 4 चौकारासह नाबाद 27 तर डावखुरा युवा फलंदाज देवधर पडीकलने नाबाद 23 धावा केल्या. सामन्याच्या निकालाला कलाटणी देणारा रोनित गजानन मोरे सामनावीर ठरला.