मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
वार्ताहर / म्हार्दोळ
शिक्षण किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रात योग्य प्रगती व्हायची असल्यास समाजाचे योगदान महत्त्वाचे असते. सरकार आपल्या परिने सर्व ते प्रयत्न करील. मात्र सामाजिक बांधीलकीतून उभे राहणारे कार्य खऱया अर्थाने प्रेरणादायी ठरते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. सर्वोदय शिक्षा मंडळ संचालित वाडे प्रियोळ येथील स्वस्तिक विद्यालयाच्या प. पू. स्वामी स्वरुपानंद सभागृह आणि प्राथमिक शाळेच्या पहिल्या मजल्याच्या उद्घाटनसोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या दोन्ही वास्तुंचे उद्घाटन रविवारी सकाळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याहस्ते झाले. यावेळी कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार तथा एनआरआय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर, जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक, प्रियोळचे सरपंच पांडुरंग गावडे, पंचसदस्य मंगलदास गावडे, मंगेश गावडे, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वासुदेव ढवळीकर, सचिव सुदेश पैदरकर, मुख्याध्यापक शिरीष आमशेकर, सभागृहासाठी आर्थिक मदत केलेले दाते भालचंद देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वस्तिक विद्यालयाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देतानाच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात मुलांमधील गुणकौशल्यांना वाव दिलेला आहे. मल्लखांब या देशी खेळाला प्रोत्साहन देऊन त्यात निपुण खेळाडू तयार केल्याबद्दल विशेष मुख्यमंत्र्यांनी शिक्षक व शाळा व्यावस्थापनाचे कौतूक केले. विद्यालयाच्या सभागृहासाठी रु. 25 लाखांची देणगी दिल्याबद्दल भालचंद्र देसाई यांचा उल्लेख करुन सामाजिक बांधिलकी जपणाऱया अशा दात्यांमुळेच सामाजाची खऱया अर्थाने प्रगती होत असते, असे नमूद केले.
विनय तेंडुलकर यांनी स्वस्तिक विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल आणतानाच इतर क्षेत्रातही विद्यार्थ्यांच्या गुणकौशल्यांना वाव दिल्याबद्दल अभिनंदन केले. भालचंद्र देसाई यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी मल्लखांबची प्रात्यक्षिके सादर केली. नाम फलकाचे अनावरण व दीप प्रज्ज्वलीत करुन मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. सभागृहासाठी देणगी दिलेले दाते व शिक्षकांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार तर शिक्षण, क्रीडा व अन्य क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. वासुदेव ढवळीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शिरीष आमशेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा शिकेरकर यांनी तर सुदेश पैदरकर यांनी आभार मानले.