जावलीच्या सभापती जयश्री गिरी यांचे दातृत्व
आनेवाड़ी / धनंजय गोरे
राजकीय आणि सामाजिक जीवनात वाढदिवसाला आता अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. वाढदिवसाला कोण काय काय गिफ्ट घेऊन येतय याकडे लक्ष ठेवले जाते. मात्र जावली पंचायत समितीच्या सभापती ह.भ.प.जयश्री मणिलाल गिरी यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिगाव येथील नविन आरोग्य उपकेंद्राच्या तसेच पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीसाठी स्वमालकीची पंधरा गुंठे जागा ग्रामपंचायत महिगावचे नावे करून जनतेला गिफ्ट दिले आहे या जागेचा नोंदणी दस्त गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्याकडे सोपविण्यात आला.
आजकाल वाढदिवसाचे फॅड मोठया प्रमाणात वाढले आहे. अशात राजकीय लोकांचा वाढदिवस म्हटला की मोठी धामधूम बघायला मिळते. जावली तालुक्याच्या प्रथम नागरिक पंचायत समितीच्या सभापती जयश्री गिरी यांचा नुकताच वाढदिवस झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केवळ फोनवरच शुभेच्छांचा स्वीकार केला. महिगावाला प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला व पशुवैद्यकीय दवाखान्याला जागा उपलब्ध होत नव्हती आणि माणसांच्या आणि पशुधनाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. माणसे गुंठ्या गुंठ्यासाठी भांडत बसतात तर गावासाठी एवढी जागा फुकट कोण देणार मात्र, आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो हा विचार करून अध्यात्माचा आणि वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासणाऱ्या जयश्री गिरी व त्यांचे पती माजी सभापती सुहास गिरी यांनी निर्णय घेऊन भागातील जनतेला व पशुधनाला आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आपल्या मालकीची पंधरा गुंठे जागा शासनाच्या नावे करून दिली. सभापती गिरी यांच्या या दातृत्वाबद्दल अनेकांनी अभिनंदन केले.
यावेळी गट विकास अधिकारी सतीश बुद्धे, दुय्यम निबंधक बर्गे, ग्रामपंचायत महिगावचे प्रशासक मासाळ, सागर पवार, किशोर पवार,अमित भोसले, सुनिल पवार, अभिषेक जगदाळे, विलास पवार,राजेंद्र माने, दत्तात्रय सुर्वे, पोफळे, संजय शेलाटकर, अमर जंगम महेश पवार, सुनिल फरांदे, दत्तात्रय फरांदे आदी उपस्थित होते.