- उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला कोरोना सद्यस्थिती व उपाययोजनांचा आढावा
ऑनलाईन टीम / पुणे :
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिकची खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्क व हातांची स्वच्छता तसेच सामुहिक कार्यक्रमामध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले.
‘कोविड-19 व्यवस्थापना’बाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई ऑनलाईन तर सभागृहात खा. गिरीष बापट आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात सर्वच यंत्रणांचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवरही अधिकची खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या. परदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर लक्ष ठेवा तसेच नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे. शासनाने काही प्रमाणात शिथिलता दिली असली तरी कोरोना अजूनही गेलेला नाही त्यामुळे दक्षता घेत नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गो-हे यांनी कोविड व्यवस्थापनासंदर्भात प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाबाबत समाधान व्यक्त केले.
खा. गिरीश बापट यांनी रुग्णवाहिकेची उपलब्धता, ससून रुग्णालयाचे सुरू असलेले काम तसेच कोविड सेंटर आदी विषय मांडले. कोरोना व्यवस्थापनाबाबत प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनाबाबत समाधान व्यक्त केले.