डी. के. शिवकुमार यांचा सोशल मीडियावर खोचक सवाल
प्रतिनिधी/ बेळगाव
एम. के. हुबळी, ता. कित्तूर येथे सायकलवरून वृद्धाचा मृतदेह नेण्यात आला होता. रविवारी हा प्रकार घडला होता. या प्रकरणी सोशल मिडियावर यासंबंधीचे व्हिडिओ आणि छायाचित्रे व्हायरल झाली होती. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सरकारवर टीका केली आहे.
शिवकुमार यांनी फेसबुकच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. एम. के. हुबळी येथे मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचा मृतदेह नेण्यासाठी त्यांना साधी रुग्णवाहिका का मिळाली नाही? भर पावसात सायकलवरून मृतदेह न्यावा लागला. तुमचे सरकार कोठे आहे? असा खोचक सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी तातडीने त्याची दखल घेतली होती. रविवारी रात्री एक पत्रक प्रसिद्धीस देऊन अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, याची काळजी घेण्याची सक्त सूचना त्यांनी अधिकाऱयांना केली होती. जिल्हाधिकारी, आरोग्य व कुटुंबकल्याण अधिकाऱयांशी चर्चाही करण्यात आली होती.
हा प्रकारच मुळात अमानुष आहे. मृतदेहावर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याची गरज आहे. मग तो कोरोना बळी असो किंवा नैसर्गिक मृत्यू झालेला असो, असे सांगत पालकमंत्र्यांनी अधिकाऱयांना धारेवर धरले होते. अशा प्रसंगी नागरिकांनी कोणाशी संपर्क साधावा, याची योग्य ती कल्पना द्या. यासाठी एक स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक जाहीर करा, अशी सूचनाही केली होती.
एम. के. हुबळी येथील त्या 70 वषीय वृद्धाच्या कुटुंबीयांवर अशी वेळ का आली, याची माहिती मिळविण्यात येत आहेत. उपलब्ध माहितीनुसार वृद्धाच्या मृत्यूनंतर कोरोनामुळे त्याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे कोणीच अंत्यक्रियेसाठी जमले नाहीत. कुटुंबीयांनी सरकारी इस्पितळात जाऊन डॉक्टरांना घडला प्रकार सांगितला. रुग्णवाहिकेची मागणीही केली, पण त्यांनी दाद दिली नाही. पंचायतीने त्यांना दोन पीपीई किट दिली होती. ती किट घालून भर पावसात सायकलवरून मृतदेह ढकलत न्यावा लागला. मृत वृद्धाच्या मुलाने आपल्या मित्राच्या मदतीने हे सोपस्कार पूर्ण केले. हा प्रकार नगर पंचायत सदस्य पुट्टप्पा पट्टणशेट्टी यांना कळाला. त्यांनी आपली मालवाहू रिक्षा पाठवून नंतर रिक्षातून मृतदेह नेण्यास मदत केली. या प्रकरणाने आता काँग्रेस-भाजपमध्ये कलगीतुरा सुरू झाला आहे..