प्रतिनिधी / बेळगाव
शाळा-कॉलेजमध्ये दाखल होताच आता दुचाकी घेऊन देण्याचा हट्ट केला जातो. कमी पगाराची नोकरी मिळाली तरी पहिल्यांदा दुचाकी लागतेच. परंतु पोस्ट ऑफीसमध्ये साहाय्यक पोस्टमास्तर या पदावर असतानाही प्रभाकर कलपत्री यांनी आपल्या 32 वर्षांच्या सेवेमध्ये कायम सायकलवरचा प्रवास केला. या सायकलच्या प्रवासामुळेच आपण आजवर तंदुरुस्त असल्याचे ते सांगतात.
प्रभाकर कलपत्री हे चव्हाट गल्ली येथील असून, त्यांचे वडील पोस्ट खात्यात असल्यामुळे वडिलांकडूनच त्यांनी प्राथमिक धडे घेतले. वडिलांची डायरी लिहिणे, त्यांना कामात मदत करणे हे करता करता 1988 मध्ये क्लार्क म्हणून ते पोस्ट खात्यात रुजू झाले. पहिली 5 वर्षे कोडगु जिल्हय़ातील मडिकेरी येथे त्यांनी सेवा बजावली. त्यानंतर यरगट्टी, बेळगाव कचेरी पोस्ट ऑफीस व मुख्य पोस्ट ऑफीस येथे सेवा बजावली आहे.
सध्या ते बेळगावच्या मुख्य पोस्ट कार्यालयात साहाय्यक पोस्टमास्तर म्हणून कार्यरत आहेत. आजही वयाच्या 60 व्या वषी सकाळी 6 वाजता सायकल चालवून ते कार्यालयात पोहोचतात. दुपारी घरी येऊन पुन्हा सायकलने कार्यालयात जातात. अधिकारी पदावर असतानाही त्यांचा कोणताही बडेजाव दिसून येत नाही.
म्हणून पोस्टमन आजारी पडत नाहीत
पोस्ट खात्यामध्ये काम करणारे सर्रास व्यक्ती या सायकलवरूनच प्रवास करतात. पोस्टमन व ग्रामीण भागातील डाक सेवक अधिकाधिक सायकलचा वापर करतात. दररोज सायकल चालविल्यामुळे त्यांचा व्यायाम होत असतो. त्यामुळेच पोस्टमन सहसा आजारी पडत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेऊन सायकलकडे वळावे, असे कलपत्री यांनी सांगितले.
ना मधुमेह ना उच्च रक्तदाब
कलपत्री यांनी दुचाकी शिकूनही त्याकडे तितकेसे लक्ष दिले नाही. ते दिवसातून दोन वेळा चव्हाट गल्ली ते कॅम्प येथील कार्यालय असा प्रवास करायचे. सायकल चालविल्यामुळे त्यांच्या शरीराचा व्यायाम होत होता. त्यामुळे आज ते साठ वर्षाचे असतानाही त्यांना ना मधुमेह ना उच्च रक्तदाब, आजपर्यंत कोणताही मोठा आजार जवळ आला नसल्याचे ते सांगतात.