टिळकवाडी पोलिसांची कारवाई, आठ सायकली जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
सायकल चोरी प्रकरणी प्रभूनगर, खानापूर येथील एका युवकाला अटक करण्यात आली आहे. टिळकवाडी पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली असून त्याच्या जवळून चोरीच्या आठ सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
परशराम पराप्पा नायक (वय 32, रा. प्रभूनगर, खानापूर) असे त्याचे नाव आहे. बेळगाव शहर व उपनगरांत त्याने सायकली चोरल्याची कबुली दिली आहे. त्याच्या जवळून आठ सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक नूरअहम्मद, उपनिरीक्षक जमखंडी, के. के. सवदत्ती, महेश पाटील, मारुती मरनिंगगोळ, सैयद गुडारद, मल्लिकार्जुन पात्रोट व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. बेळगाव शहर व उपनगरांत सायकली, मोटार सायकली चोरीच्या घटना वाढल्या आहेत. परशरामने आणखी कोठे चोरी केली आहे का? याची चौकशी करण्यात येत आहे.