पॅरिस / वृत्तसंस्था
येथील अर्लिन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटन तारका सायना नेहवालचे महिला एकेरीतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. कृष्ण प्रसाद गरग व विष्णू वर्धन यांनी मात्र पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारत जेतेपदाच्या दिशेने महत्त्वाकांक्षी पाऊल टाकले आहे.
लंडन ऑलिम्पिक कांस्यविजेत्या सायनाला डेन्मार्कच्या लिनेविरुद्ध 17-21, 17-21 अशा सरळ फरकाने पराभव पत्करावा लागला. अवघ्या 28 मिनिटातच ही लढत निकाली झाली. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी या जोडीला 18-12, 19-21 अशा फरकाने थायलंडच्या जोंगकोल्फन-प्राजोंगजई यांच्याविरुद्ध उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
कृष्णा व विष्णू या जोडीने मात्र पुरुष दुहेरीत सुवर्णपदकाच्या दिशेने जोरदार आगेकूच केली. या जोडीने शनिवारी झालेल्या उपांत्य लढतीत इंग्लंडच्या कॅलम हॅमिंग व स्टीव्हन स्टॉलवूड यांचा 21-17, 21-17 असा पराभव केला. ही लढत 35 मिनिटे चालली. आज (रविवार दि. 28) होणाऱया अंतिम लढतीत त्यांचा मुकाबला इंडोनेशियाच्या सॅबर गुतमा-मोहम्मद रेझा पहलेवी इसफानी किंवा इंग्लंडच्या बेन लेग-सीन व्हेन्डी यांच्याशी होईल.
उपांत्य फेरीत कृष्णा व विष्णू हे पहिल्या गेममध्ये 4-2 फरकाने आघाडीवर होते. पण, इंग्लिश जोडीने अचानक 11-8 अशी आघाडी मिळवली होती. नंतर भारतीय जोडीने प्रारंभी 13-13 अशी बरोबरी प्राप्त केली व त्यानंतर विजयही खेचून आणला. दुसऱया गेममध्ये कृष्णा व विष्णू यांनी 11-7 अशी आघाडी मध्यंतरापर्यंत घेतली आणि ती पुढे कायमही राखली. 21 वर्षीय कृष्णा दुहेरीतील अव्वलमानांकित असून उमेदीच्या कालावधीत त्याने सात्विकसाईराज रणकिरणरेड्डीविरुद्ध दुहेरीचे धडे गिरवले आहेत.