वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू तसेच लंडन ऑलिंपिक स्पर्धेतील कास्यपदक विजेती सायना नेहवालने आपल्या बॅडमिंटन सरावाला यापूर्वीच प्रारंभ केला आहे पण साईच्या पी गोपीचंद अकादमीमध्ये सुरू होणाऱया राष्ट्रीय बॅडमिंटन सराव शिबिरात ती आणखी दोन आठवडय़ानंतर सहभागी होणार आहे.
2021 साली होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताच्या आठ बॅडमिंटनपटूंकडून पदकांची अपेक्षा असून त्यांच्यासाठी 7 ऑगस्टपासून हैद्राबादमधील साईच्या पी. गोपीचंद अकादमीमध्ये सराव शिबिराला प्रारंभ करण्यात आला आहे. या सराव शिबिरासाठी तेलंगणा शासनाने 1 ऑगस्ट रोजी अधिकृत मान्यता दिली होती. पी. गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमध्ये बॅडमिंटन सरावासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. माजी टॉप सीडेड सायना नेहवालने आपला पती बॅडमिंटनपटू पी. काश्यप समवेत तसेच 2014 च्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत कास्यपदक विजेता गुरूसाईदत्त यांच्यासमवेत पी. गोपीचंद अकादमीच्या जवळच असलेल्या केंद्रामध्ये सराव करीत आहेत. या केंद्रामध्ये सायना गेल्या आठवडय़ापासून बॅडमिंटनचा सराव करीत आहे. या सराव केंद्रामध्ये मोठय़ा प्रमाणात सुविधा नसल्याचे सांगण्यात आले. आता ती 15 दिवसांच्या कालावधीनंतर पी. गोपीचंद अकादमीमध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटन सराव शिबिरात दाखल होणार आहे. या शिबिरात दाखल होण्यासाठी आपल्याला शारीरिक तंदुरूस्ती अधिक प्रमाणात राखवी लागेल. तसेच ती गोपीचंद यांच्या परवानगीची वाट पाहात आहे.
भारताचा पुरूष बॅडमिंटनपटू पी. काश्यप हा सध्या मानांकनात 24 व्या स्थानावर आहे. अनेक बॅडमिंटनपटूंना सराव करण्यासाठी गोपीचंद अकादमीमध्ये सुसज्ज पुरेसे बॅडमिंटन कोर्ट उपलब्ध आहेत. या सरावावेळी कोरोना संदर्भातील सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याचे बंधन राहील. या शिबिरात चिराग, सात्विक आणि अश्विनी पोनाप्पा हे अद्याप दाखल झालेले नाहीत. सध्या या शिबिरात चार ते पाच बॅडमिंटनपटू नियमितपणे सराव करीत आहेत. शुक्रवारी सुरू झालेल्या या शिबिरात पी.व्ही. सिंधु, साई प्रणित आणि एन. सिक्की रेड्डी सहभागी झाले होते. बेंगळूरच्या प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीमध्ये पोनाप्पा आणि सिक्की रेड्डी हे सध्या बॅडमिंटनचा सराव करीत आहेत. के. श्रीकांत आपल्या सरावाला चालू आठवडय़ात प्रारंभ करणार आहे.