भाजपमध्ये प्रवेश : दिल्ली विधानसभेसाठी प्रचारात उतरणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बॅडमिंटनमध्ये भारताची मान उंचावणाऱया सायना नेहवालने भाजपात प्रवेश करत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. सायना नेहवालचा जन्म हरियाणामधील असला तरी आता ती दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रचार करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. तसेच सायनाने यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी खूप मेहनत घेतात. ते क्रीडापटूंनाही प्रोत्साहन देत असतात. त्यामुळेच मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असे सायनाने स्पष्ट केले. क्रीडाक्षेत्रात मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत अनेक पुरस्कार जिंकले आहेत. आज देशासाठी चांगले काम करणाऱया पक्षात मी प्रवेश करत आहे. भाजप प्रवेशाच्या माध्यमातून मी देशवासियांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करीन, असेही सायनाने सांगितले.
सायना नेहवालसोबत तिची मोठी बहिण अबू चंद्रांशू नेहवाल हिनेही यावेळी भाजपात प्रवेश केला. सायना नेहवालच्या आधी अनेक खेळाडूंनी भाजपात प्रवेश केला आहे. पैलवान योगेश्वर दत्त आणि बबिता फोगाट यांनीदेखील भाजपात प्रवेश केला आहे. भारतातील यशस्वी खेळाडूंच्या यादीत तिचा समावेश आहेत. 2015 मध्ये सायना नेहवाल जागतिक रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर येणारी पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरली होती. तसेच तिने ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदकाची कमाई केली होती.