थायलंड मास्टर्स सुपर 300 स्पर्धा आजपासून, समीर वर्मा, एचएस प्रणॉयचाही सहभाग
बँकॉक / वृत्तसंस्था
आघाडीची बॅडमिंटन तारका सायना नेहवाल व किदम्बी श्रीकांत यांच्यासमोर आजपासून सुरु होणाऱया थायलंड मास्टर्स सुपर 300 स्पर्धेच्या माध्यमातून ऑलिम्पिक स्थान निश्चितीच्या दिशेने आगेकूच करण्याचे लक्ष्य असेल. 2019 मध्ये सायना व श्रीकांत यांची कामगिरी सातत्यपूर्ण नव्हती. यामुळे बॅडमिंटन मानांकन यादीत ते अनुक्रमे 22 व 23 व्या स्थानी आहेत. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पहिल्या 16 मधील प्रत्येकी दोन खेळाडू पात्र ठरणार आहेत आणि यासाठी 26 एप्रिल ही कटऑफ तारीख आहे.
सध्याच्या घडीला वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधू (6 वी मानांकित) व बी. साई प्रणित (11 वा मानांकित), दुहेरीत सात्विकराज रणकिरणरेड्डी-चिराग शेट्टी (8 वे मानांकित) यांचा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभाग जवळपास निश्चित मानला जातो.
मागील वर्षातील अनेक स्पर्धात सायना नेहवाल व किदम्बी श्रीकांत यांना पहिल्या काही फेऱयांमध्येच गाशा गुंडाळावा लागला. त्यामुळे, ते टोकियो ऑलिम्पिकच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करण्यात बरेच मागे पडले. याच कारणामुळे त्यांनी प्रीमियर बॅडमिंटन लीग (पीबीएल) मधून माघार घेत टोकियो ऑलिम्पिक पात्रतेच्या मोहिमेवर अधिक लक्ष केंद्रित करणे पसंत केले.
अर्थात, यापैकी श्रीकांतला यंदा नव्या वर्षातही लागोपाठ स्पर्धांमध्ये पहिल्याच फेरीत अपयशाचा सामना करावा लागला. त्याला प्रारंभी, मलेशियात चायनीज तैपेईच्या तिएन चेनकडून तर इंडोनेशियात स्थानिक खेळाडू शेसर हिरेन ऱहुस्ताव्हितो यांच्याकडून पहिल्याच फेरीत धक्कादायक पराभव स्वीकारावे लागले. लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यजेत्या सायनाला देखील इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेत जेतेपद कायम राखता आले नाही. उलटपक्षी, पहिल्याच फेरीत जपानच्या सयाका ताकाहाशीविरुद्ध तिला पराभवाचा धक्का सोसावा लागला.
ऑलिम्पिकमधील सहभाग निश्चितीसाठी एप्रिलची मानांकन यादी महत्त्वाची ठरणार असून त्यापूर्वी थायलंड ओपनसह फक्त 8 स्पर्धा होणार आहेत. साहजिकच, सायना व श्रीकांत या उभयतांनाही पात्रता निश्चित करायची असेल तर अव्वल दर्जाचा खेळ कोणत्याही परिस्थितीत साकारावा लागणार आहे.
थायलंड ओपन स्पर्धेत सायनाची मोहीम डेन्मार्कच्या लिने होजमार्क कर्सफेल्डविरुद्ध होणार असून आतापर्यंत तिच्याविरुद्ध सायनाने 4-0 असे एकतर्फी वर्चस्व गाजवले आहे. दुसरीकडे, श्रीकांतची सलामी लढत शेसर रुस्ताव्हितोविरुद्ध होईल. अन्य भारतीय खेळाडूत समीर वर्माची लढत मलेशियाच्या सातव्या मानांकित ली जी जियाविरुद्ध तर एचएस प्रणॉयची लढत आणखी एक मलेशियन बॅडमिंटनपटू ल्यू डॅरेनविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेच्या दुहेरीत भारतीय खेळाडू सहभागी झालेले नाहीत.