गुन्हेगारीला बळी पडलेल्यांनी 433 कोटी गमाविले : 55 कोटी रुपये परत मिळविण्यात पोलिसांना यश
प्रतिनिधी /बेळगाव
सायबर गुन्हय़ांचे प्रमाण वाढत असून 2019 पासून सायबर गुन्हेगारीला बळी पडलेल्या लोकांनी 433 कोटी रुपये गमाविले आहेत. यातील फक्त 55 कोटी रुपये परत मिळविण्यामध्ये पोलिसांना यश आले. फक्त बेंगळूरमध्येच 90 टक्के गुन्हय़ांची नोंद झाली आहे.
कर्नाटक गृहमंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार 1 जानेवारी 2019 ते 31 जानेवारी 2022 दरम्यान 29,816 सायबर गुन्हय़ांची नेंद झाली आहे. त्यातील 735 गुन्हे 2022 च्या जानेवारी महिन्यात झाले होते. सर्व गुन्हय़ांमध्ये लोकांनी 433 कोटी रुपये गमविले आहेत. फक्त या जानेवारीत 15 कोटी रुपये गमविले आहेत. उपलब्ध माहितीनुसार 2019 मध्ये 11,606 सायबर गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये लोकांनी 153 कोटी रुपये गमविले आहेत. 2020 मध्ये 10,013 गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये लोकांनी 108 कोटी रुपये गमाविले आहेत. 2021 मध्ये गुन्हय़ांचे प्रमाण 7,462 इतके खाली आले तरी लोकांनी 157 कोटी रुपये गमविले आहेत.
सायबर विभागाने 2021 पासून बँक खाते गोठविण्याची पद्धत सुरू केल्यापासून सायबर फसवणुकीतून पुन्हा पैसे परत मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येता क्षणीच लोकांनी जर पोलिसांना कळविले तर पैसे परत मिळण्याची शक्मयता वाढते. यासाठी त्यांनी वेळ वाया न घालविता 100 किंवा 122 या हेल्पलाईनशी संपर्क साधावा.
गुन्हा नोंदविण्यासाठी कॉल जोडला गेल्यावर तीन क्रमांक दाबला तर हा कॉल सायबर गुन्हे विभागाला जोडला जातो. तक्रारदारांनी आपला आयडी नंबर आणि व्यवहार कसा झाला याची माहिती देणे भाग आहे. त्यानंतर पोलीस सदर खाते गोठवू शकतात व खात्यातून गेलेले पैसे परत खात्यात जमा होतात. आकडेवारीनुसार लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या तुलनेत मोबाईलधारक सायबर गुन्हेगारीला अधिक बळी पडत आहेत.
अलीकडे गुन्हेगार जाळय़ात शिकार अडकण्यासाठी आपण सैन्यात असल्याची बतावणी करत आहेत. त्यामुळे लष्कराचा उल्लेख आल्यानंतर लोक विश्वास ठेवून व्यवहार करतात. त्यामुळे सावध राहणे आवश्यक आहे.
2019 पासूनचा सायबर गुन्हय़ांचा तपशील
वर्ष | नोंद झालेले गुन्हे | शोध लागलेले गुन्हे | गमाविलेली रक्कम | परत मिळालेली रक्कम |
2019 | 11606 | 2454 | 153 कोटी रु. | 10.2 कोटी रु. |
2020 | 10013 | 2922 | 108 कोटी रु. | 13.6 कोटी रु. |
2021 | 7462 | 1283 | 157कोटी रु. | 30.5 कोटी रु. |
2022 (31 जानेवारी पर्यंत) | 735 | 14 | 15 कोटी रु. | 1.2 कोटी रु. |
एकूण | 29,816 | 6673 | 433 कोटी रु. | 55.5कोटी रु. |