येडियुराप्पा यांचे आश्वासन : वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांच्या मेळाव्यात सहभागी
प्रतिनिधी / बेंगळूर
समाजासमोर सर्वात मोठे आव्हान असणाऱया सायबर गुन्हय़ांना समर्थपणे तोंड देण्यात येईल. त्याकरिता बेंगळूर शहरात 8 पोलीस स्थानके स्थापन करण्यात आली आहेत. त्यांची संख्या आणखी वाढविण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिली.
विधानसौध येथे शुक्रवारी पार पडलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांच्या वार्षिक मेळाव्यात सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. बेंगळूरसह राज्याचे दहशतवादी कृत्यांपासून संरक्षण करण्यासाठी दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) स्थापन करण्यात आले आहे. या पथकाला आणखी बळकट करण्यात येईल. मागील वर्षी अत्यंत कमी गुन्हय़ांची नोंद झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. पोलीस खात्याचे कठोर परिश्रम आणि सुयोग्य नियोजनामुळे गंभीर गुन्हय़ांचे प्रमाण कमी झाले आहे, असे ते म्हणाले.
महिला आणि मुलांच्या रक्षणासाठी उत्तम कार्यपद्धतीचा अवलंब करून कोणत्याही प्रकारच्या गुन्हय़ांचा छडा 24 तासांच्या आत लावण्यात येत आहे. पोलीस नेमणुकीच्या वयोमर्यादेत दोन वर्षांनी वाढ करण्यात आली आहे. महिला पोलिसांच्या भरतीसाठी आरक्षणात 20 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 60 पोलीस स्थानकांचा दर्जा वाढविण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
सुधारणेवर भर देणार...
पोलीस खात्याला आवश्यक असणाऱया सर्व सुविधा पुरवून खात्याची क्षमता वाढविण्यात येईल. राज्यातील जनतेला आनंदी आणि सन्मानाने जगता यावे यासाठी पोलीस खात्यात सुधारणेवर भर दिला जात आहे. समस्या घेऊन पोलीस स्थानकात येणाऱयांना आदराने वागवावे. पोलीस किंवा अधिकऱयांविषयी कोणत्याही तक्रारी किंवा आरोप होणार नाहीत, याची खबरदारी घेण्याची सुचनाही देण्यात आल्याचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सांगितले.