नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आयपीएल प्रँचायझी सनरायजर्स हैदराबादचे सहायक प्रशिक्षक सायमन कॅटिचनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अलीकडेच झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये सनरायजर्स हैदराबादने काही खेळाडूंना अधिक किंमतीला खरेदी केले. त्यावर कॅटिच नाराज होते. हैदराबादने या मेगा ऑक्शनमध्ये निकोलस पूरन (10.75 कोटी), वॉशिंग्टन सुंदर (8.75 कोटी) व राहुल त्रिपाठी (8.50 कोटी) यांच्यासाठी मोठी रक्कम मोजली होती.
कॅटिचसह विंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा व माजी भारतीय फलंदाज हेमांग बदानी यांना हैदराबादच्या प्रशिक्षण पथकात समाविष्ट केले गेले होते. या संघाच्या प्रशिक्षणाची मुख्य धुरा टॉम मुडी व मुथय्या मुरलीधरन यांच्याकडे आहे. मात्र लिलाव झाल्यानंतर काहीच कालावधीत कॅटिच यांनी आपला राजीनामा सादर केला. काव्या मारन यांच्या नेतृत्वाखालील हैदराबाद व्यवस्थापनाने याबाबत अद्याप अधिक माहिती दिलेली नाही.