वित्त विभागाची मान्यता : नियोजन विभागाने काढला आदेश
प्रतिनिधी/कोल्हापूर
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथीला (पुणे) राज्य शासनाने मंजूर केलेल्या अनुदानापैकी 94 कोटी 25 लाखाचा निधी गुरूवारी नियोजन विभागाने वितरीत केला. या निधीसाठी खासदार युवराज संभाजीराजे यांच्यासह अखिल भारतीय मराठा महासंघ आणि इतर मराठा संघटनांनी पाठपुरावा केला होता.
राज्याच्या नियोजन विभागाने सारथीसाठी 2021-2022 या आर्थिक वर्षात 145 कोटींचे अनुदान मंजूर केले होते. त्यापैकी 50 कोटी 75 लाखांचे अनुदान यापूर्वी सारथीला देण्यात आले होते. उर्वरीत 94 कोटी 25 लाख रूपयांचे अनुदान देणे बाकी होते. ते वितरीत करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली. त्यानंतर नियोजन विभागाने गुरूवारी अनुदान वितरीत करण्याचा आदेश काढला. अवर सचिव व्ही. एम. बोरकर यांनी या संदर्भातील आदेश प्रसिद्ध केला.
सारथीला उर्वरीत अनुदान देण्याच्या शासन निर्णयाचे स्वागत आहे. पण सारथीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱया योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.
-राजेंद्र कोंढरे, राष्ट्रीय अध्यक्ष, अ. भा. मराठा महासंघ