राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांची माहिती; उपकेंद्राला गती देण्याची मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी
सारथीच्या कोल्हापूर उपकेंद्राला गती देण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघ आणि समविचारी संस्था, संघटना यांच्याकडून राजाराम महाविद्यालय परिसरात असणाऱया उपकेंद्रासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच सारथीच्या निर्मितीचा अहवाल आणि ध्येय, उद्दीष्ट असलेल्या आर्टिकल ऑफ असोसिएशन मेमोरंडम ऑफ असोसिएशन व इतर उद्दीष्टांची माहितीही यावेळी सादर करण्यात येणार आहे.
कोंढरे म्हणाले, सारथीचे उपकेंद्र कोल्हापुरमध्ये 26 जून 2020 रोजी सुरु झाले. या उपकेंद्राच्या माध्यमातून कोल्हापूर, सिंधुदूर्ग, सांगली जिल्हय़ातील मराठा, मराठा कुणबी आणि कुणबी घटकासाठी संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास यासाठी उपक्रम सुरु होतील अशी अपेक्षा होती. मात्र सारथी प्रशासनाने 26 जून 2021 पासून या उपकेंद्रामार्फत स्थानिक पातळीवर एकही उपक्रम घेतलेला नाही. उद्घटनानंतर सारथी पुणे ची माहिती देण्यासाठी दोन कर्मचारी व एका अधिकाऱयाची नियुक्ती केली आहे. सारथी पुणे कडून सध्या फेलोशिप, यूपीएससी परीक्षा शिष्यवृत्ती हे दोनच उपक्रम सुरु आहेत.
सारथी संस्थेचे तीन प्रमुख आणि 82 उपउद्दीष्ट आहेत. मराठा समाजाला आरक्षण नसल्याने या संस्थेच्या माध्यमातून पारंपरिक शिक्षण घेवून बाहेर पडणाऱया विद्यार्थ्यांना ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत टिकता यावे. जीवनाच्या विविध टप्प्यांवर त्यांना यश मिळविता यावे, इतकी अपेक्षा सारथी कडून आहे. सारथीच्या स्थापनेनंतर 7 महिन्यात 15 प्रकल्प सुरु करुन 22 प्रकल्प शासन मान्यतेसाठी पाठवले होते. यापैकी 2 उपक्रम सुरु आहेत. संस्थेकडे निधी असूही उपक्रम नाहित. यामुळे समाजातील तरुण, तरुणींचे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी आणि सारथीला गती देण्यासाठी आंदोलन करणार असल्य़ाची माहिती कोंढरे यांनी दिली. पत्रकार परिषदेला राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष शशीकांत पाटील, महिला अध्यक्षा शैलजा भोसले, उत्तम जाधव, चंद्रकांत चव्हाण, शंकरराव शेळके आदी उपस्थित होते.