फोंडा तालुक्यातील बहुतेक गणपतींचे विसर्जन
प्रतिनिधी / फोंडा
सार्वजनिक गणपतींचा विसर्जन सोहळा म्हणजे मोठा थाटमाट… फुलांनी सजवलेल्या वाहनांत विराजमान गणराय आणि सोबत भक्तगणांची भव्य दिंडी मिरवणूक. बाप्पाला निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची प्रचंड गर्दी. लाऊल स्पिकरवर बाप्पा मोरय्या…असा आसमंतात घुमणार अखंड गजर…आणि दारुकामाची नेत्रदीपक आतषबाजी. तब्बल चार पाच तास चालणारा हा जल्लोष यंदा दिसणार नाही. फोंडा शहर व तालुक्यातील बहुतेक सार्वजनिक गणपतींनी दीड दिवसांतच निरोप घेतला आहे.
क्रांती मैदान फोंडा येथील सदर गणेशोत्सव, इंदिरा मार्केट जुन्या बसस्थानकावरील श्री झरेश्वर गणपती, वरचा बाजार येथील बुधवारपेठ मंडळाचा गणपती यासह तालुक्यातील बहुतेक सार्वजनिक गणपतींचे काल रविवारी सायंकाळी विसर्जन करण्यात आले. कुठलाच जल्लोष नाही की, गर्दी नाही. अगदी शांत वातावरणात मंडळातील अवघ्याच सदस्यांच्या उपस्थितीत श्री गणरायाला निरोप देण्यात आला. कोरोना महामारीचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन सरकारी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर होण्यापूर्वीच बहुतेक गणपती मंडळांनी चतुर्थीच्या दीड दोन महिने आधी झालेल्या आमसभांमध्ये यंदाचा गणेशोत्सव मर्यादित स्वरुपात व कमीत कमी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कुठल्याच सावर्जनिक गणपतीच्या ठिकाणी भव्य मंडप, सजावट किंवा अन्य कुठलाही थाटमाट दिसला नाही. दीड किंवा पाच दिवसातच उत्सव आटोपता घेण्यावर सर्वांचा भर होता. त्यानुसार सर्व काही निर्विघ्नपणे पार पडले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक अंतर, गर्दीवर नियंत्रण व स्वच्छता आवश्यक असल्याने सांस्कृतिक कार्यक्रम, भाविकांसाठी महाप्रसाद या सर्व कार्यक्रमांना यंदा फाटा देण्यात आला. मंडळाच्या काही मोजक्याच सदस्यांनी गणपतीची विधीवत स्थापना, पूजा, आरत्या एवढय़ा मर्यादित कार्यक्रमांनी उत्सव आटोपता घेतला. फोंडा तालुक्यात छोटी मोठी मिळून साधारण 15 ते 20 गणेशोत्सव मंडळे आहेत. फोंडय़ातील सर्वात जुना सदर सार्वजनिक गणपती यंदा क्रांती मैदानावरील या आपल्या मूळ जागेत न पुजता, मंडळाच्या तिस्क फोंडा येथील सभागृहात पुजण्यात आला होता. दीड दिवसांच्या सेवेनंतर कपिलेश्वरी तलावात श्रींचे विसर्जन करण्यात आले. वरचा बाजार फोंडा येथील बुधवारपेठ व इंदिरा मार्केट, जुने बसस्थानक येथील श्री झरेश्वर मंडळाच्या गणपतींनीही दीड दिवसांत निरोप घेतला. शिरोडय़ातील बाजार व ओंकार गणपतींचे विसर्जनही दीड दिवसांतच करण्यात आले. बोरी येथील साखळय़ो, बेतोडा येथील शिवपंचायतन, कुंडई गणेशोत्सव समिती, कपिलेश्वरी येथील रथामळ गणेशोत्सव मंडळाच्या गणपतांचेही असेच दीड दिवस पुजन करण्यात आले. तिस्क उसगाव येथील सार्वजनिक गणपती पाच दिवस तर ढवळी येथील सार्वजनिक गणपती सात दिवस मुक्काम करणार आहे. मात्र या सर्व मंडळानी सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करीत उत्सवाचे स्वरुप आटोपशिर ठेवले आहे. नित्य पूजा, आरत्या, काही धार्मिक विधी व विसर्जन अशाच प्रकारे कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्ती एरवी आकाराने भव्य म्हणजे किमान 9 ते 10 फुट उंचीच्या असतात. यंदा हे सर्व गणपती 3 ते 4 फुट उंचीचे होते. मंडपात मोजकीच सजावट व कुठलाच जल्लोष किंवा गाजावाजा न करता बहुतेक मंडळांनी गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी निरोप दिला.