सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावचा गणेशोत्सव हा संपूर्ण कर्नाटकमध्ये मोठा गणेशोत्सव म्हणून ओळखला जातो. मात्र कोरोनामुळे या सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध लादण्यात आले आहेत. ते निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ यांच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना जे जाचक नियम घातले जातात ते थांबवावेत. कारण विविध समस्यांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तोंड द्यावे लागत आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी किमान 10 बाय 10 आकाराचे मंडप घालण्याची परवानगी द्यावी, परवानगी मिळविण्यासाठी जी जाचक प्रक्रिया राबविली जात आहे ती रद्द करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
कोरोना रोखण्यासाठी जे निर्बंध घातले आहेत त्या नियमांचे पालन आम्ही जरुर करू. मात्र गणेशोत्सवावरच जे निर्बंध घालण्यात येत आहेत, ते अत्यंत चुकीचे आहेत. केवळ 8 ते 10 दिवसच गणेशोत्सव साजरा केला जातो. तेव्हा अशा प्रकारचे निर्बंध घालणे योग्य नाही. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करून सार्वजनिक गणेशोत्सवावर घातलेले निर्बंध मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.