प्रतिनिधी / कोल्हापूर
वडीलांच्या मृत्यूनंतर आईच्या नावाने पेन्शनच्या कागदांची पुर्तता करण्यासाठी 5 हजारांची लाच स्विकारल्या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ट लिपीकास लाचलुचपतने जेरबंद केले. राजेश प्रकाश खाडे वय 36 रा. न्यु पॅलेस, रमनमळा असे त्याचे नांव आहे. याबाबतची फिर्याद अविराज उदय सावंत यांनी दिली होती. गुरुवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरात ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अविराज सामंत यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभाग गडहिंग्लज उपविभागातील मार्ग प्रकल्प कार्यालयातून सेवानिवृत्त झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांचे दुखःद निधन झाले. यानंतर अविराज सावंत यांनी वडीलांच्या पश्च्यात त्यांची पेन्शन आईला मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केला होता. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता राजेश खाडे यांच्याकडे होते. मात्र खाडे याने कागदपत्रांमध्ये विविध त्रुटी काढत काम रेंगाळत ठेवले. काही दिवसांनी खाडे याने सावंत यांच्याकडे या कामातील सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन देण्यासाठी 5 हजार रुपयांची मागणी केली. सावंत यांनी याकामी वारंवार खाडे यांची भेट घेतली.
यानंतर त्यांनी याबाबतची रितसर तक्रार लाचलुचपत विभागाकडे दिली. लाचलुचपत विभागाने लाच मागितल्याची खातरजमा करुन गुरुवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास सापळा रचला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पार्किंगमध्ये खाडे याने सावंत यांना थांबण्यास सांगितले. पार्किंगमध्ये 5 हजारांची रक्कम स्विकारताना खाडेस लाचलुचपत विभागाने जेरबंद केले. पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, विकास माने, नवनाथ कदम, सुनिल घोसाळकर, सुरज अपराध यांनी केली.
तीन दिवसांत दुसरी कारवाई
लाचलुचपत विभागाने गेल्या तीन दिवसांत दोन कारवाया केल्या. दोन दिवसांपूर्वी शाहूपुरी पोलीस ठाण्यात कारवाई करुन पोलीस नाईक सागर कोळी यास जेरबंद केले होते. तर गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता राजेश खाडे जाळ्यात अडकला.