मनोहर कालकुंद्रीकर, बबिता पोवार यांचा समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
येथील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने देण्यात येणारा वाचनालयाचा पत्रकार पुरस्कार-2020 जाहीर करण्यात आला आहे. सोमवार दि. 18 रोजी सायंकाळी 5.30 वाजता सार्वजनिक वाचनालयाचे सभागृह, गणपत गल्ली येथे बॅ. नाथ पै व्याख्यानमालेच्या उद्घाटन कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या पत्रकार पुरस्काराकरिता मराठी विभागासाठी दैनिक रणझुंझारचे संपादक मनोहर कालकुंद्रीकर तर कन्नड विभागासाठी दैनिक कन्नडम्माचे वार्ताहर राजशेखर हिरेमठ यांना जाहीर झाला आहे. तसेच प्रा. एस. आर. जोग महिला पत्रकार पुरस्कार-2020 करिता मराठी विभागासाठी बेळगाव दैनिक स्वतंत्र प्रगतीच्या संपादक बबीता राजेंद्र पोवार व कन्नड विभागासाठी बिग न्यूजच्या वार्ताहर भाग्यश्री सुनगार यांना जाहीर करण्यात आला आहे.
रोख रक्कम, मानचिन्ह, प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. जयवंत मंत्री, प्रशांत बर्डे, अनंत लाड व डॉ. सर्जू काटकर यांच्या निवड समितीने हा निर्णय घोषित केला आहे. यावेळी वाचनालयाच्या अध्यक्षा सुनिता मोहिते, उपाध्यक्ष नेताजी जाधव, कार्यवाह रघुनाथ बांडगी, सहकार्यवाह ऍड आय. जी. मुचंडी उपस्थित होते.