प्रतिनिधी/ बेळगाव
येथील सुप्रसिद्ध सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेस शनिवार दि. 18 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव याळगी यांच्याहस्ते या व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे. कॅम्प येथील गोगटे रंगमंदिर (स्कूल ऑफ कल्चर) येथे सायंकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पत्रकार खासदार संजय राऊत यांची प्रकट मुलाखत होणार आहे. प्राचार्य आनंद मेणसे व नरेंद्र कोठेकर (मुंबई) हे त्यांची मुलाखत घेणार आहेत.
संजय राऊत हे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. ‘सामना’ या दैनिकाचे कार्यकारी संपादक म्हणून गेली अनेक वर्षे ते काम पाहत आहेत. देशात वेळोवेळी घडणाऱया विविध विषयावर त्यांनी अत्यंत परखडपणे लेख लिहून आपले विचार मांडले आहेत. ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकापासून त्यांच्या पत्रकारितेस प्रारंभ झाला. एक निर्भिड पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. शिवसेनेच्यावतीने राऊत यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. खुशवंतसिंग, निखील चक्रवर्ती, भूपेश गुप्ता, अरूण शौरी व बेळगावचे दाजीबा देसाई या नामवंत पत्रकारांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून आपली कारकिर्द गाजविली आहे. तीच परंपरा संजय राऊत हे पुढे चालवित आहेत. एक उत्तम अभ्यासू पत्रकार व मुत्सद्दी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.