प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. गोरगरीब रुग्णांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने गोवावेस येथील मराठा मंदिर येथे कोविड विलगीकरण केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे अनेक गरिबांना दिलासा मिळाला आहे. त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य समजून सार्वजनिक वाचनालय बेळगाव यांच्याकडून 21 हजार रुपयांची मदत करण्यात आली.
युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्याकडे वाचनालयाचे उपाध्यक्ष नेताजी जाधव यांनी हा धनादेश सुपूर्द केला आहे. म. ए. युवा समितीने एक सामाजिक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या काळात असा उपक्रम करण्याची नितांत गरज होती. त्यामुळे अनेकांना मदत मिळत आहे. अनेक कोरोना रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी परतत आहेत. ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. त्यांच्या या उपक्रमाला यावेळी नेताजी जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह रघुनाथ बांडगी, सदस्य अनिल लाड व इतर मान्यवर उपस्थित होते. म. ए. युवा समितीचे बाळू जोशी, महादेव चौगुले यांच्यासह इतर उपस्थित होते.