प्रतिनिधी/ बेळगाव
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे तसेच शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य वस्तूंची विक्री करणे कायद्याने बंदी आहे. पण याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात नाही. त्यामुळे तंबाखूजन्य वस्तूंच्या विक्रीबरोबरच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱयांवर कठोर कारवाई करण्याच्यादृष्टीने महापालिकेच्या अधिकाऱयांना व कर्मचाऱयांना नगरविकास खात्याच्यावतीने प्रशिक्षण देण्यात आले.
महापालिका मुख्य कार्यालयात ऑनलाईनद्वारे मंगळवारी मनपाच्या अधिकाऱयांना तंबाखूविरोधी कायद्याबाबत माहिती देण्यात आली. कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून सार्वजनिक स्थळी धूम्रपान करणाऱयांवर कारवाई करण्याची सूचना करण्यात आली. सार्वजनिक स्थळी तंबाखू चघळणे, पान खाऊन थुंकणे, तसेच शैक्षणिक आवारात तंबाखूजन्य वस्तूंची विक्री करणे यावर बंदी आहे. मात्र, याची अंमलबजावणी होत नाही.
सध्या कोरोनासारख्या विषाणूचा प्रसार होण्यास तंबाखूजन्य वस्तू कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे तंबाखूविरोधी कायद्याबाबत महापालिकेच्या अधिकाऱयांना व कर्मचाऱयांना या कार्यशाळेत माहिती देण्यात आली. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात 200 मीटर अंतराच्या आत तंबाखूजन्य वस्तू विक्री करण्यास बंदी आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्याच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी तंबाखूविरोधी कायद्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. तंबाखूजन्य वस्तूंची विक्री करण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. अशा वस्तूंची विक्री करण्याकरिता 2017 च्या कायद्यात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करावी. तंबाखूजन्य वस्तूंची विक्री करण्यासाठी वेगळा कक्ष असणे आवश्यक आहे. पॅकबंद असलेल्या वस्तूंची विक्री करावी, अशा अनेक नियमावली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेला याबाबत विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे विविध मार्गदर्शन कार्यशाळेप्रसंगी मनपाच्या स्वच्छता निरीक्षकांना व सुपरवायझरना देण्यात आले.
याप्रसंगी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, पर्यावरण साहाय्यक अभियंत्या महादेवी आणि महसूल निरीक्षक उपस्थित होते.