पोस्टकार्डवर स्थान : देशभरातील बारा कलांना स्थान
संतोष सावंत / सावंतवाडी:
सावंतवाडीतील जगप्रसिध्द लाकडी खेळणी आता पोस्ट कार्डवर झळकली आहेत. भारतीय पोस्टाने देशातील बारा हस्तकलांना पोस्ट कार्डवर स्थान दिले आहे. त्यात सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांचा समावेश आहे. पोस्टाच्या दीडशे वर्षाच्या
प्रवासानिमित्ताने भारतीय पोस्टाने खास पोस्ट कार्ड काढली आहेत. ही कार्ड आता ग्रीटिंग स्वरुपात पाठविता येणार आहेत.
जागतिक पोस्टकार्ड दिनाचे औचित्य साधून एक ऑक्टोबरला मुंबई व गोवा येथे नव्या पोस्टकार्डचे प्रकाशन झाले. यावेळी गोवा येथील पोस्ट मास्तर डॉ. एन. विनयकुमार, डॉ. सुधीर जखेरे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा झाला.
आपल्या देशातील हस्तकलेचा सन्मान व्हावा, म्हणून भारतीय पोस्टाने महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि ओडिसा येथील हस्तकलांना पोस्टकार्डवर स्थान दिले आहे. त्यात सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांनी बाजी मारली आहे.
सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत बापूसाहेब महाराज यानी सावंतवाडीतील या लाकडी खेळण्यांना व कारागिरांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यानंतर शिवरामराजे भोसले यांनीही चितारी कारागिरांना राजाश्रय मिळवून देताना ही कला सातासमुद्रापार पोहोचवली. राजमाता कै. सत्वशीलादेवी भोसले यांनीही गंजिफा कलेला नवी ओळख दिली. गेली कित्येक वर्षे सावंतवाडी चितारआळीतील लाकडी खेळणी देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत कोलगाव येथे या लाकडी खेळण्यांचे अनेक कारखाने आहेत. दरवषी लाखो पर्यटक ही लाकडी खेळणी शो-पीस म्हणून खरेदी करतात. पूर्वी गणेशचतुर्थी पुरती मर्यादित असलेली ही लाकडी खेळणी आता घराघरात पोहोचली आहेत. लाकडी खेळण्यांमध्ये आंबा-काजूपासून बनविलेले शो पीस, भातुकली, लाकडी गाडय़ांसह असंख्य वस्तू आहेत.
इतर कलांचाही सन्मान
भारतीय पोस्ट खात्याने महाराष्ट्रातील या कोकणातील सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना वेगळे स्थान मिळवून दिले आहे. सावंतवाडी व्यतिरिक्त आंध्रप्रदेशची कोंडापल्ली, एटीकोप्पका खेळणी, गुजरात कच्छ येथील लाकडी खेळणी, हिमाचलमधील हिमाचली बाहुल्या, मध्यप्रदेशची बुधनी खेळणी, ओडिशाची जोखंढेई लाख खेळणी, तामिळनाडूची तंजावूर खेळणी, तेलंगणाची निर्मल खेळणी, कर्नाटकची छन्नपटना आणि उत्तरप्रदेशची मिर्झापूर बनारसी खेळणी यांचे फोटो पोस्टकार्डवर आहेत. तीन ऑक्टोबरपासून या पोस्ट कार्डचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. गुगलवर हे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे.
पोचपावती!
सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम सावंत-भोसले यांनी भारतीय पोस्ट विभागाचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, माझे आजोबा शिवरामराजे भोसले आणि सत्वशीलादेवी भोसले यांनी येथील कारागिरांना एक वेगळा सन्मान दिला होता. आता त्यांच्या कार्याला पोस्ट खात्याने पोचपावती दिली आहे. त्यामुळे या कलेला खऱया अर्थाने राजाश्रय मिळाला आहे.
सावंतवाडीतील प्रसिध्द लाकडी खेळणी कारखानदार व दुकानदार काशिनाथ काणेकर यांच्या स्नुषा अंकिता काणेकर यांनी पोस्टाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे. काही महिन्यापूर्वी कोल्हापूर विभागाकडून पोस्ट खात्याच्या एका
कार्यक्रमासाठी लाकडी खेळण्याचा संच नेण्यात आला. त्यात अशोकस्तंभ व अन्य खेळणी होती. आता पोस्टकार्डवर स्थान देऊन आमचा सन्मान केला आहे.
सावंतवाडी पोस्ट विभागाच्या असिस्टंट श्रीमती अर्चना गोरे यांनी सांगितले की, पोस्टाने प्रकाशित केलेली ही कार्ड आपण मित्र-मैत्रीण व नातेवाईकांना भेट स्वरुपात पाठवू शकणार आहे. त्यामुळे ही कला आता देशभर जाणार आहे.