रुग्ण आढळल्याने निगुडेत दक्षता : मुंबईहून आलेली वृद्धा पॉझिटिव्ह
प्रतिनिधी / सावंतवाडी:
सावंतवाडी तालुक्यात निगुडे येथे होम क्वारंटाईन असलेली वृध्दा कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या तीन झाली आहे. तर एकूण कोरोना रुग्ण 39 झाले आहेत. तालुक्यात कोरोना रुग्ण सापडले असले तरी ते क्वारंटाईन आहेत. त्यामुळे ‘कोरोना’पासून तालुका आतापर्यंत सुरक्षित राहिला आहे.
दरम्यान, निगुडे मधलीवाडी येथे सापडलेली कोरोना पॉझिटिव्ह वृद्धा मुंबईतून आली होती. तिला ताप आल्याने तिचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर वृद्धा होम क्वारंटाईन होती. मात्र, ती पॉझिटिव्ह आल्याने घरातील तिघांचे तसेच त्यांच्या संपर्कातील सर्वांचे स्वॅब तपासण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांनी सांगितले. निगुडे-मधलीवाडी परिसर कंटेंटमेंट झोन जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कारिवडेत पहिला रुग्ण
सावंतवाडी तालुक्यात कारिवडेत ‘कोरोना’चा पहिला रुग्ण सापडला. मुंबईतून आल्यानंतर तो क्वारंटाईन होता. त्यानंतर तालुक्यात ठिकठिकाणी रुग्ण सापडले. ते सर्व मुंबईहून आलेले आणि क्वारंटाईन असलेले होते. त्यामुळे तालुक्यात ‘कोरोना’चा फैलाव झाला नाही. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 38 वर गेली. शेवटचे दोन रुग्ण एक जुलैला सापडले. ते सावंतवाडीत क्वारंटाईन होते. परंतु ते राजापूरचे होते. त्यांचे नातेवाईक गुळदुवेचे आहेत.
36 रुग्ण ‘कोरोना’मुक्त
आता निगुडे येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने संख्य 39 वर गेली आहे. एकच रुग्ण तालुक्यात दगावला. परंतु 36 रुग्ण बरे होऊन गेले. आता तालुक्यात तीनच रुग्ण असून दोघांची प्रकृती चांगली आहे. निगुडे येथे रुग्ण सापडल्याने मधलीवाडी परिसर कंटेंटमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. ग्रामस्थ सतर्क असून संपर्कात आलेल्यांचे स्वॅब तपासण्यात येणार असल्याचे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी सांगितले.