परदेश प्रवास करून आलेले 69 : पुणे-मुंबईतून आलेले पाच हजार : आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण
प्रतिनिधी / सावंतवाडी:
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यात आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात 69 नागरिक परदेश प्रवास करून, तर पाच हजाराहून अधिक नागरिक पुणे-मुंबई व अन्य भागातून आल्याचे आढळले आहे. तर तालुक्यात परदेश प्रवास करून आलेल्या नागरिकांपैकी 33 जणांना ‘क्वारंटाईन’ करून ठेवण्यात आले होते. त्यापैकी सध्या सावंतवाडीत चार आणि ओरोस येथे दोघांना ‘क्वारंटाईन’ करून ठेवण्यात आले आहे. उर्वरित सर्वांना सोडून देण्यात आले असून त्यांना घरीच ‘क्वारंटाईन’ राहण्यास सांगण्यात आले आहे. सावंतवाडी तालुक्यात परराज्यातील मजुरांसाठी कॅम्प बनविण्यात आले असून तेथे त्यांची राहण्या-जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याचे पंचायत समिती सभापती मानसी धुरी यांनी सांगितले.
सावतंवाडी तालुक्यात आंबोली, सांगेली, निरवडे, मळेवाड, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बाहेरून आलेल्यांचे खबरदारी म्हणून सर्वेक्षण करण्यात आले. गावागावात आणि घराघरात जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यात 68 नागरिक परदेश प्रवास करून आलेले होते. त्यापैकी 33 जणांना ‘क्वारंटाईन’ करून ठेवण्यात आले होते. त्यापैकी सहाजण अद्यापही ‘क्वारंटाईन’ असून उर्वरित लोकांना घरी पाठविण्यात आले आहे. त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. परंतु त्यांना घरीच ‘क्वारंटाईन’ केले आहे. तर पुणे, मंबई आदी भागातून पाच हजाराहून अधिकजण तालुक्यात आले. त्यांनाही घरीच राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. अद्यापही सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. तालुका ‘कोरोना’पासून दूर राहण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे, असे धुरी यांनी सांगितले.
ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तू नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रशासनामार्फत सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. यासंदर्भात ग्रामसेवकांना सूचना देण्यात आल्याचे धुरी यांनी सांगितले.
सावंतवाडीत पाच खेळाडू ‘होम क्वारंटाईन’
दिल्ली येथे खेळण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षक आणि चार खेळाडू अशा पाचजणांना प्रशासनाने ‘क्वारंटाईन’ राहण्यास सांगितले आहे. त्यांनीही आपण घरीच ‘क्वारंटाईन’ राहणार असल्याचे सांगितले. सदर खेळाडू दिल्ली येथे 12 मार्चला खेळण्यासाठी गेले होते. ते 18 मार्चला सावंतवाडीत रेल्वेने परतले. त्यांनी रेल्वेने प्रवास केल्याने प्रशासनाने त्यांचा शोध घेतला. त्यांना ओरोसला ‘क्वारंटाईन’ राहण्यासाठी प्रशासनाने सांगितले. परंतु 15 दिवसाहून अधिक काळ झाला आणि कोणतीही लक्षणे नसल्याने या सर्वांनी आपण घरीच ‘क्वारंटाईन’ राहतो, असे स्पष्ट केले. त्याला प्रशासनाने अनुमती दिली आहे. ते आता घरीच ‘क्वारंटाईन’ राहणार आहेत.