सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यांना होणार फायदा
जिल्हय़ात आतापर्यंत 9891 बाहेरील व्यक्ती दाखल
प्रतिनिधी / ओरोस:
जिल्हय़ात सावंतवाडी येथे स्वॅब नमुना घेण्याची सुविधा शनिवारपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग या तालुक्यातील रुग्णांचे स्वॅब नमुने आता सावंतवाडी येथे घेतले जाणार आहेत. यामुळे जिल्हा रुग्णालयावरील भार थोडा कमी होणार असून सिंधुदुर्गनगरीपर्यंतचा रुग्णांचा
प्रवासही थांबणार आहे.
दरम्यान, जिल्हय़ाबाहेरून जिल्हय़ात दाखल होणाऱया नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्हय़ातून सिंधुदुर्गात 15 मे रोजी 3 हजार 421 व्यक्ती दाखल झाल्या. आजअखेर जिल्हय़ात एकूण 9 हजार 891 व्यक्ती दाखल झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
1119 व्यक्ती विलगीकरणात
सद्यस्थितीत जिल्हय़ात एकूण 1 हजार 119 व्यक्ती विलगीकरणात असून त्यापैकी 518 जणांना संस्थात्मक विलगीकरणात तर 601 व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 986 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 867 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील आठ अहवाल यापूर्वीच पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 859 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आणखी 119 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 114 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत शनिवारी 7 हजार 288 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत आढळलेल्या आठ कोरोना बाधित रुग्णांपैकी सहा रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असून इतर दोन रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
शनिवारपासून सावंतवाडी येथे तपासणीसाठी स्वॅब घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दोडामार्ग, वेंगुर्ले आणि सावंतवाडी या तीन तालुक्मयातील विलगीकरणातील व्यक्ती तसेच कोविड हेल्थ केअर सेंटर व कोविड केअर सेंटरमधील व्यक्तींचे नमुने या ठिकाणी घेतले जाणार आहेत. या परिसरातील रुग्णांना याचा फायदा होणार आहे.
28 जणांचे अहवाल प्रतीक्षेत
जिल्हय़ात आढळलेल्या तीन ‘कोरोना’बाधित रुग्णांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या 28 व्यक्तींचे घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या सर्व व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे अहवाल अजून प्राप्त झालेले नाहीत, असे सांगण्यात आले.