नगराध्यक्षांचाच विरोध : आज-उद्याच्या बैठकांकडे लक्ष : यंदा 85 टक्के घरपट्टी वसुली
संतोष सावंत / सावंतवाडी:
सावंतवाडी शहरात सुमारे साडेअकरा हजार सदनिका आहेत. यातून दरवर्षी जवळपास 1 कोटी 92 लाख रुपये महसूल पालिकेला मालमत्ता कराच्या रुपाने प्राप्त होतो. या वर्षापासून घरपट्टी तब्बल 25 टक्क्यांनी वाढविण्याबाबत शासनाच्या निर्देशानुसार पालिका प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. ही वाढ झाल्यास पालिका प्रशासनाच्या तिजोरीत अडीच कोटी रुपयांची भर पडणार आहे. मात्र, नागरिकांचे बजेट कोलमडणार आहे. बारा वर्षांनी प्रशासनाने घरपट्टी वाढीचा निर्णय घेतला आहे.
पालिका प्रशासनाच्या या निर्णयावर अंतिम निर्णयासाठी 29 सप्टेंबरला कौन्सिलची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. तर, 28 सप्टेंबरच्या मासिक बैठकीत घरपट्टी वाढीबाबत काय ठराव घेतला जातो, याचीही उत्सुकता आहे.
वाढीव घरपट्टीच्या प्रस्तावाला नगराध्यक्ष संजू परब यांचाच विरोध आहे. गेल्या दहा वर्षांत शहरात घरपट्टी वाढ झाली नाही, हे जरी सत्य असले, तरी सध्या कोरोना महामारीचा काळ असताना अचानक 25 टक्के वाढ नागरिकांना परवडणारी नाही. त्यामुळे वाढीव घरपट्टीबाबतचा हा प्रस्ताव गेले काही महिने रेंगाळला होता. ही वाढ करण्याबाबत सत्ताधारीच राजी नसल्याने नगराध्यक्षांनी विशेष बैठक बोलावली आहे. त्यामुळे वाढीव घरपट्टीबाबत सत्ताधारी आणि विरोधक शिवसेना नगरसेवक काय भूमिका घेतात, याची उत्सुकता आहे.
या घरपट्टी वाढीला शहरवासीयांकडूही मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. गेल्या दीड वर्षापासून शासनाकडून विकासकामांसाठी निधी मिळालेला नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने घरपट्टी वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. एकंदर स्थिती पाहता शहरात दर वर्षी मोठय़ा संख्येने सदनिकांची भर पडत आहे. नवीन घरांना घरपट्टी वाढवण्याचा निर्णय योग्य आहे. परंतु, सरसकट सर्वच घरांना 25 टक्क्यांनी घरपट्टी वाढवून नागरिकांना आर्थिक संकटात लोटण्यासारखे आहे.
नगरपालिकेतील विद्यमान बॉडीचा कार्यकाल येत्या डिसेंबरमध्ये संपत आहे. या पार्श्वभूमीवरही या निर्णयाला अत्यंत महत्व आले आहे. मुख्याधिकारी जयंत जावडेकर व त्यांच्या टीमने 25 टक्के वाढीव घरपट्टीचा प्रस्ताव तयार केला आहे. प्रशासनाने यंदा सुमारे 85 टक्के घरपट्टी वसुली केली आहे. म्हणजे जवळपास सव्वा कोटी रुपये जमा झाले आहेत. शहरात घरपट्टी थकबाकीचे प्रमाण अल्प आहे. दरवर्षी सदनिका नव्याने वाढत आहेत. त्यातून पालिका प्रशासनाला वाढीव घरपट्टी मिळत आहे. आता वाढीव घरपट्टीच्या प्रस्तावावर काय निर्णय होतो, याची उत्सुकता आहे.