सावंतवाडी/ प्रतिनिधी-
सावंतवाडी सबनीसवाडा येथील तुळजा बिल्डिंग मधील बंद फ्लॅटमध्ये विवाहिता निधी निलेश पास्ते (वय 28- राहणार कलंबिस्त, पास्तेवाडी) या महिलेने मंगळवारी रात्री फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्येबाबत कारिवडे येथील माहेरच्या कुटुंबियांनी पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिस अधिक तपास करत आहेत. सावंतवाडी पोलिस ठाण्यात आज बुधवारी कारिवडे येथील सरपंचसह ग्रामस्थांनी धाव घेत आपल्या मुलीला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
पती निलेश पास्ते येथील पोस्ट विभागात पोस्टमन म्हणून कार्यरत आहेत. या आत्महत्येप्रकरणी पती निलेश याला पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. घटनास्थळी काही संशयास्पद असे आढळले नाही.