सुरक्षित बाहेर काढण्यात यश, माळवाशीतील घटना
विशेष प्रतिनिधी/ देवरूख
नजीकच्या माळवाशी येथे सावजाचा पाठलाग करणाऱया बिबटय़ाला विहिरीचा अंदाज न आल्याने तो थेट 40 फ्gढट विहिरीत कोसळला. वनविभागाने त्याला जीवदान दिले आणि रात्री उशिरा त्याला सुरक्षित जंगलात सोडून देण्यात आले.
देवरूखजवळच्या माळवाशी येथे रत्नागिरी मार्गानजीक संदीप चाळके यांचे हिलपॉईंट नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलजवळ पाण्याची मोठी विहीर आहे. याच विहिरीवरील पाण्याचा पंप चालू करण्यासाठी संतोष जाधव हे जातात. सोमवारी सायंकाळी 6 च्या सुमारास ते पंप चालू करण्यासाठी गेले असता त्यांना बिबटय़ा विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी आर. सी. भवर, परिक्षेत्र वनाधिकारी प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक नानू गावडे, संतोष कदम, शर्वरी कदम, दिनेश गुरव आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाने 40 फुट खोल असलेल्या विहिरीत जाळी टाकून बिबटय़ाला काठावर आणले. यानंतर त्याला पिंजऱयात जेरबंद करण्यात आले. हा बिबटय़ा 1 वर्षाची मादी असल्याचे सांगण्यात आले तसेच विहिरीत पडल्यानंतरही तिला कोणतीही इजा झाली नव्हती. रात्री उशिरा त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.