‘बरसात बाबा’चे हस्तक सावजाच्या शोधात : 11 लाखांच्या बदल्यात 11 कोटींच्या नोटांचा पाऊस, बेळगाव परिसरात होतेय चर्चा
प्रतिनिधी /बेळगाव
भोंदू बुवा महाराजांच्या कथित चमत्कारांची चर्चा नेहमी होत असते. अधूनमधून समाजात असे महाराज आपली करामत दाखवत असतात. अनेक साधूसंत शिक्षण संस्था चालवून समाजाला दिशा देण्याचे काम करतात. मात्र, अशा संतांच्या नावाला बट्टा लावण्याचे काम भोंदू बाबा करीत असतात. सध्या अशाच एका भोंदू बाबाच्या करामतीची बेळगाव परिसरात हवा आहे.
पैसा हा सगळय़ांनाच पाहिजे आहे. कितीही मिळाला तरी कोणाचे समाधान होत नाही. मिळेल तसा पुन्हा हवाच असतो. याच मानवी मनःस्थितीचा फायदा घेत बेळगावकरांना गंडविण्यासाठी मध्यप्रदेशहून आलेल्या एका बाबाने करामत सुरू केली आहे. या बाबाच्या नादी लागून अनेक जण फशी पडले आहेत. बेळगाव आणि गोवा परिसरात या ‘बरसात बाबा’ची सध्या हवा सुरू आहे. या बाबाचे हस्तक त्याचे अवास्तव महात्म्य सांगून सावजांना गाठत आहेत. बाबाचे महात्म्य कथन करून लाखात गुंतवणूक करा, कोटय़धीश व्हा, अशी जाहिरातबाजी करीत आहेत.
‘तरुण भारत’ला या बरसात बाबाच्या करामतीविषयी माहिती मिळाली आहे. मध्यप्रदेशमधील इंदूरहून अधूनमधून बेळगावला येणाऱया या बाबाने बेळगावात आपल्या भक्तांची एक फळीच तयार केली आहे. या हस्तकांच्या माध्यमातून सावज हेरण्यात येते. मोठा डल्ला मारण्यासाठी बाबाची धडपड सुरू असली तरी त्याच्या मनाप्रमाणे सावज सापडत नाही, अशी स्थिती आहे.
मोठी गुंतवणूक, मोठा पाऊस
‘11 लाख रुपये द्या, मी तुम्हाला त्याचे 11 कोटी रुपये करून दाखवतो, ही काही जादू नाही. 72 तासांच्या विशेष पूजेनंतर तुमच्या घरात पैशांचा पाऊस पडतो’, असा दावा करणाऱया या बाबाने बेळगाव परिसरात छोटे मोठे पैशांचे पाऊस पाडविल्यासंबंधी चविष्ट चर्चा सुरू आहे. छोटी गुंतवणूक, छोटा पाऊस, मोठी गुंतवणूक, मोठा पाऊस या न्यायाने बाबा पूजा मांडतो.
25 वर्षांपूर्वी असाच एक बाबा टिळकवाडी परिसरात अवतरला होता. केवळ लंगोट परिधान करून पूजेला बसणाऱया या बाबाने काही धनिकांच्या घरात सोने दुप्पट करण्याचे सांगून धनिकांना गंडवले होते. पुरुष व महिलांच्या अंगावरील दागिने व घरातील दागिने एकत्र करून एका भांडय़ात ठेवायचे. या भांडय़ाचे लंगोट बाबा पूजन करायचा. त्याने एक नागसापही पाळला होता. पूजनाच्यावेळी गळय़ात तो साप अडकवायचा. त्यामुळे या बाबाबद्दलची भयभक्ती वाढायची.
भांडय़ातील सोने आपल्या पूजनानंतर दुप्पट होते, असे सांगत या बाबाने एका धनिक कुटुंबातील संपूर्ण दागिनेच पळविले होते. या बाबाविरुद्ध टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआरही दाखल झाला. मात्र, तो बाबा पुन्हा कधी बेळगावात नजरेस आला नाही. तसेच पोलिसांनाही सापडला नाही. त्यानंतरच्या काळात अधूनमधून अनेक छोटे बाबा होऊन
गेले. आता लंगोट बाबाच्या धर्तीवर बरसात बाबाचे कारनामे सुरू झालेले आहेत.
72 तास पूजा चालते
उपलब्ध माहितीनुसार सावजाने 11 लाख रुपये तयार ठेवायचे. पैसे तयार झाले की हस्तकांकरवी बाबाला निरोप द्यायचा. मग विशेष पूजेसाठी बाबा त्या घरात दाखल होतो. 72 तास पूजा चालते. दोन दिवस 11 लाखांच्या नोटा ठेवून त्यांचे पूजन केले जाते. तिसऱया दिवशी अक्षरशः बाबा पैशांचा पाऊस पाडवतो. एक-दोन नव्हे तर 11 कोटी रुपयांचा पाऊस पडतो. बाबाची यासाठी एकच अट असते. पाऊस पडताना कोणाला पाहता येणार नाही. बाबा सांगेल त्यावेळी सावज व त्याच्या कुटुंबीयांना डोळे बंद करून बसावे लागणार
आहे.
बाबाला अद्याप मोठे सावज मिळाले नाही
सावजाने डोळे बंद केले की 11 लाख रुपये घेऊन बाबा आपल्या हस्तकांसह तेथून पोबारा करतो. बेळगाव परिसरात या बाबाला अद्याप मोठे सावज मिळाले नाही म्हणून त्याने प्रत्यक्षात पाऊस पाडला नसला तरी पैशांच्या पावसाची चर्चा मात्र जोरदार सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार विश्वास पटावा यासाठी बाबाने एक हजाराच्या बदल्यात 11 हजार रुपयांच्या नोटांचा पाऊस पाडविल्याचे त्याचे हस्तक सांगत आहेत. या बरसात बाबाच्या नादी लागून किती धनिक फसणार की त्याच्या मुसक्मया आवळल्या जाणार, हे पहावे लागणार आहे.
…तर बाबाचा काय लाभ?
पैशांचा पाऊस पाडविणाऱया बाबाला या पावसामुळे काय लाभ होतो, असा प्रश्न प्रत्येकाला पडणारच. 11 लाख रुपयांच्या बदल्यात 11 कोटींचा पाऊस पाडविल्यावर त्याला 1 कोटी कमिशन द्यावे लागते. ही अट ठेवूनच बाबा विशेष पूजेला बसतो. 72 व्या तासाला पूजा संपविताना मात्र घरातील कोणीही किमान अर्धा तास डोळे उघडायचे नसतात. याच वेळेत पाऊस पडण्याआधीच बाबा अंतर्धान पावलेला असतो.