येळ्ळूर येथील निवृत्त शिक्षिकेचे 12 तोळय़ांचे दागिने हातोहात लुटले
प्रतिनिधी / बेळगाव
बाजारपेठेत, बस स्थानकावर व इतर गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या बॅगमधील दागिने पळविण्याच्या घटना वाढल्या आहेत. या चोऱयांमागे महिला गुन्हेगारच सक्रिय असल्याची माहिती मिळाली असून चार दिवसांत घडलेल्या दोन घटनांमुळे एकच खळबळ माजली आहे. गर्दीच्या ठिकाणी जाताना महिलांनी सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
येळ्ळूर (ता. बेळगाव) येथील एका निवृत्त शिक्षिकेच्या बॅगमधील 12 तोळय़ांचे दागिने हातोहात पणविण्यात आले आहे. मंगळवार दि. 24 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 ते 4 यावेळेत ही घटना घडली असून सरदार्स हायस्कूल मैदानापासून ऑटोरिक्षातून प्रवास करताना हा प्रकार घडला आहे. खडेबाजार पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
येळ्ळूर येथील निवृत्त शिक्षिका सुमन गोपाळराव कंग्राळकर (वय 62) या मंगळवारी आपल्या पतीसह जाधवनगर येथे वैद्यकीय उपचारासाठी गेल्या होत्या. स्पर्श क्लिनीकमध्ये उपचार घेवून गावी जाण्यासाठी सुमन व गोपाळराव या वृध्द दांपत्याने सरदार्स हायस्कूल मैदानाजवळ ऑटोरिक्षात बसले. ही रिक्षा पवन हॉटेलजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी तीन महिला चढल्या.
पवन हॉटेलजवळ रिक्षात बसलेल्या महिला संचयनी सर्कलजवळ उतरल्या. पुढे सुमन व गोपाळराव या रिक्षातून गेल्या. 4 वाजता हे दांपत्य घरी पोहोचले. त्यावेळी सुमन यांच्या व्हॅनिटी बॅगमधील 60 गॅमचे मंगळसुत्र व 60 ग्रॅमची मोहनमाळ असे 12 तोळय़ाचे दागिने चोरीस गेल्यास आढळून आले. या दांपत्याने तातडीने पुन्हा बेळगाव गाठले. रात्री खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद देण्यात आली.