भाजपाचे विजयी उमेदवार गणेश गावकर यांचे उद्गार, मतदारसंघात विजयोत्सवाची मिरवणूक
प्रतिनिधी /कुडचडे
आजचा दिवस हा मतदारांचा आहे. जो विजय संपादन झाला आहे तो मतदारांमुळे झालेला आहे आणि त्याचे श्रेय सर्वांना जाते. यापुढेही पक्षाजवळ सावर्डे मतदारसंघासाठी काही मागण्याची गरज पडणार नाही. पक्ष जी जबाबदारी आपल्याला देईल ती जबाबदारी आम्ही सर्व जण एकत्र येऊन काम करून पेलूया. पक्षाने कसलीही जबाबदारी दिली, तरी आपण कार्य करण्यात कुठेच कमी पडणार नाही. जी आश्वासने दिलेली आहेत ती सर्व पूर्ण करण्यात येणार, असे सावर्डे मतदारसंघात निवडून आलेले भाजपचे उमेदवार गणेश गावकर यांनी स्पष्ट केले.
कळसय, दाभाळ येथील श्री सातेरी पिसानी देवस्थानजवळून कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या विजयी मिरवणुकीच्या अगोदर समर्थकांचे आभार मानताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, मीराबागचे पंच संजय नाईक, जिल्हा पंचायत सदस्या सुधा गावकर तसेच मच्छिंद्र देसाई उपस्थित होते. राजकारणात काही गोष्टी नकळत होतात. पण त्यासाठी एकमेकांवर राग धरू नये. यंदा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी बरीच तडजोड केलेली आहे. यात आपले कुटुंबही सहभागी आहे. अडचणी सुटण्यासाठी दुजाभाव न ठेवता एकत्र उभे राहिले पाहिजे. आज जो विजयाचा आनंद निर्माण झालेला आहे तो अशाच प्रकारे कायम राखून पुढे चालत राहुया असे आवाहन आमदार गणेश गावकर यांनी शेवटी केले.
सावर्डे मतदारसंघात गणेश गावकर यांना निवडून आणले गेले आहे. त्याचा फायदा सर्वांना मिळणारच हे आपले आश्वासन आहे. ज्या प्रकारे सर्वांनी पक्ष मजबुतीसाठी कार्य केले त्याचप्रमाणे आपणही केलेले आहे. आपण बोलताना काही लोकांची मने दुखावलेली आहेत व ते फक्त पक्ष मजबूत होण्यासाठी केलेले आहे. कित्येकांनी आमच्यासमोर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा कोणताच फायदा झाला नाही हे सत्य आहे, असे खासदार तेंडुलकर म्हणाले.
आपण जेव्हा घोषित केले होते की, सावर्डे मतदारसंघात 18 हजार मते घेऊन निवडून येऊ तेव्हा काही लोकांनी आपल्याला धडा शिकवण्याची प्रतिज्ञा घेतल्याचे ऐकू आले होते. तसेच ज्या बूथमध्ये आपले घर आहे तेथे भाजपाला फक्त 80 मते मिळणार असा प्रचार केला जात होता. पण सदर बूथवर भाजपाला 135 मते प्राप्त झाली आहेत. याअगोदर गणेश गावकर व आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यंदा गावकर यांना मतदारांनी निवडून दिलेले आहे व आमदार म्हणून ते सावर्डे मतदारसंघात प्रभावीरीत्या काम करणार आहेत, असे तेंडुलकर म्हणाले. नंतर देवस्थानच्या प्रांगणातून विजयी मिरवणूक सुरू करण्यात आली व करमणे, धडेमार्गे मीराबाग, कापशे, सावर्डे, काले व पुढे जाऊन मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने पुरुष, महिला व खास करून युवा समर्थक स्वतःची दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन मिरवणुकीत सामील झाले होते .