मणेराजूरी / वार्ताहर
सावर्डे ता. तासगाव येथील उपसरपंच पोपट माने यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव नाट्यमय घडामोडींत फेटाळला गेला. तहसीलदार रवींद्र रांजणे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.
सावर्डे ग्रामपंचायतीत 13 ग्रामपंचायत सदस्य व एक लोक नियुक्त सरपंच आहेत. सदस्यांची अजून 11 महीने मुदत राहीली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व पै.संभाजीराव पाटील सावर्डेकर गटाच्या सदस्यांनी एकत्र येत ठरलेल्या मुदतीत राजीनामा न दिल्याने उपसरपंच पोपट माने यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. मतदानावेळी प्रत्यक्षात अविश्वास दाखल करणाऱ्या या गटाचेच चार सदस्य फुटल्याने उपसरपंच पोपट माने यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव फेटाळला गेला. त्यामुळे सध्या भाजपचे विधानसभा अध्यक्ष असलेले अॅड.स्वप्नील पाटील यांनी अनपेक्षितपणे गावच्या या राजकारणात बाजी मारली आहे.
उपसरपंच पोपट माने यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव फेटाळला गेल्यानंतर कार्यकर्त्यानी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.यावेळी दिलीप पाटील यांनी उपसरपंच पोपट माने व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केला. दरम्यान, उपसरपंचावरील अविश्वास ठराव फेटाळल्याने पुढचे लक्ष कोण ?कोणते राजकारण गावात घडते याची ग्रामस्थांत कुजबुज सुरु आहे.