कोल्हापूर/प्रतिनिधी
जिल्हा व सत्र न्यायाधीश 2 एस. आर. पाटील यांनी सावर्डे ( ता. हातकणंगले ) येथील युवकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी न्यायालयाने दोषी धरले. त्याला एक वर्षे सक्त मजुरी व पाच हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली. अमर आण्णाप्पा वडर ( रा. सावर्डे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर ) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून पी. जे. जाधव यांनी काम पाहिले.
या खटल्याची माहिती अशी, आरोपी अमर वडर याने पंधरा ऑगस्ट या स्वांतत्र्य दिनी (१५/०८/२०१७ ) ध्वजारोहण करुन, शाळेतून घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा हात धरला. तु मला आवडतेस, तु माझेशी लग्न करणार आहेस की नाही, असे म्हणाला. त्यास पिडीत मुलीने नकार दिला असता आरोपी वडरने पिडीतेस शिवीगाळ करुन, मी तुला सोडणार नाही. असे म्हणून तिला मारहाण करुन जखमी केले व परत मारहाणीची धमकी दिली होती.
याप्रकरणी पिडीतेने आरोपी वडर विरोधी तक्रार दाखल केली. या घडल्या घटनेची गांभीर्याने दखल घेत पेठवडगाव पोलीसांनी त्याच्याविरोधी भा. द. वि. कलम ३५४ ( अ ), ( ड ), ३२३, ५०४, ५०६ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्यवे गुन्हा नोंद करुन, त्याला अटक केली.
या गुन्ह्याचा तपास करुन पेठवडगाव पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची जिल्हा व सत्र न्यायाधीश 2 एस. आर. पाटील यांच्या न्यायालयात सुनावणी सुरु झाली. या खटल्यात सरकार पक्षाकडून एकूण ७ साक्षीदार तपासले. यामध्ये पिडीत मुलगी व इतर सर्व साक्षीदारांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी वकील सौ. प्रतिभा जाधव यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन, न्यायालयाने आरोपीला भा. द. वि. स. कलम ३५४ ( अ ), ( ड ), ३२३, ५०४, ५०६ व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ चे कलम १२ अन्यवे दोषी धरले. त्याला एक वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपयाचा दंड अशी शिक्षा ठोठावली.