तिनिधी / धारबांदोडा
सावर्डे मतदारसंघात भाजपाचे गणेश गावकर यांनी तब्बल 5190 मतांची मोठी आघाडी मिळवत विजय प्राप्त केला आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी माजी बांधकाममंत्री व अपक्ष उमेदवार दीपक पाऊसकर यांचा त्यांनी पराभव केला. गणेश गांवकर यांना 11,877 तर दीपक पाऊसकर यांना 6687 मते मिळाली. तिसऱया स्थानावर आलेले मगो पक्षाचे विनायक उर्फ बालाजी गांवस यांना 3768 मते मिळाली.
सावर्डे मतदारसंघातून एकूण 7 उमेदवार रिंगणात होते व 26530 मतदान झाले होते. रिव्होल्युशनरी गोवन्सच्या विपीन नाईक यांनी 2135, आम आदमी पक्षाचे अनिल गांवकर यांना 846, अपक्ष उमेदवार गंगाराम लांबोर यांना 554 तर काँग्रेसचे खेमलो सावंत यांना 383 मते मिळाली. 280 मतदारांनी नोटाचा वापर केला. गणेश गांवकर हे सावर्डे मतदारसंघातून दुसऱयांदा निवडून आले आहेत. यापूर्वी 2012 मध्ये भाजपातर्फेच त्यांनी ही जागा जिंकली होती. मागील 2017च्या निवडणुकीत मगो पक्षातर्फे निवडून आलेले दीपक पाऊसकर यांनी भाजपात प्रवेश केला होता व ते डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारमध्ये बांधकाममंत्री होते. मात्र त्यांना भाजपाची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. सावर्डेत काँग्रेस व आपची कामगिरी अत्यंत खराब राहिली असून पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱया रिव्होल्युशनरी गोवन्सने त्यामानाने चांगली कामगिरी केली आहे. गणेश गांवकर यांना धारबांदोडा पंचायत सोडल्यास इतर पंचायतीमध्ये मतांची आघाडी मिळाली आहे.