वार्ताहर / सावर्डे
सावर्डे तालुका हातकणंगले येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी खातेदारांमध्ये एकच झुंबड उडाली त्यामुळे जिल्हा बँकेत प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवणे आवश्यक असताना, बँक प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने बँक ग्राहकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
येथील बँकेमध्ये अनेक शेतकरी, महिला, परितक्त्या, अपंग व्यक्ती, सरकारी कर्मचारी आदी नागरिकांची खाते असून या बँकेमध्ये वारंवार पैशाच्या कारणावरून वाद होत असतात. मागितलेली रक्कम खातेदाराला तात्काळ मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांतून व्यक्त केल्या जात असतात. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास बँक उघडल्यानंतर प्रशासनाकडून कोरोना संदर्भात कोणत्याही प्रकारची दखल न घेता व्यवहार सुरू करण्यात आले.
खातेदारांना कोणत्याही प्रकारची सूचना न करता किंवा एखादा कर्मचारी शिस्त लावण्यासाठी ठेवण्याची व्यवस्था केली नसल्याचे अनेक खातेदारांनी एकाच वेळी बँकेच्या दारात झुंबड केली. यामुळे आधीच कोरोणाने भयभीत झालेल्या नागरिकांत अशा प्रकारच्या बेजबाबदारपणामुळे कोरोणा प्रसार होण्याचा धोका व्यक्त झाला. या बँकेमध्ये खातेदारांमध्ये उडवलेली झुंबड पाहून काही नागरिकांनी पेठ वडगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. असता ताबडतोब पोलीस कर्मचारी पाठवून सदरचे बँकेतील कर्मचाऱ्यांची चर्चा करून व खातेदारांना सोशल डिस्टन्स ठेवण्याचे सूचना करण्यात आली. या बँक प्रशासनाला ग्रामपंचायतीच्या वतीने वारंवार सुचना दिल्या जात असुन सुद्धा कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्याने ग्राहकांतून नाराजी व्यक्त होत आहे.