प्रतिनिधी /कुडचडे
सावर्डे मतदारसंघातील सावर्डे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारे मराठा हितचिंतक समाजाचे श्री शारदा इंग्लिश हायस्कूल, आनंदवाडी-सावर्डे हे एकमेव हायस्कूल असून 1946 पासून पाचवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सेवा देत आहे. असे हे स्कूल यंदा 75 वर्षे पूर्ण करत आहे. तसेच या हायस्कुलात शिकणाऱया विद्यार्थ्यांची व्यवस्थित सोय व्हावी या दृष्टिकोनातून हाती घेतलेल्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले असून यानिमित्त आज शनिवार 23 रोजी संध्याकाळी 4.30 वा. हायस्कूलच्या आवारात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री शारदा हायस्कूलचे अध्यक्ष प्रहर सावर्डेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमात नवीन इमारतीचे उद्घाटन होणार असून मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच सन्माननीय अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, वीजमंत्री नीलेश काब्राल, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर त्याचबरोबर दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर, सरपंच संदीप पाऊसकर, पंच अमेय नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळय़ात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. त्यात गीतगायन, पारंपरिक नृत्ये यांचे सादरीकरण होणार आहे, अशी माहिती सावर्डेकर यांनी दिली. या पत्रकार परिषदेस त्यांच्यासोबत स्कूलचे व्यवस्थापक तुषार सावर्डेकर, प्रमुख सोनाली तिळवे, सचिव सिद्धेश नाईक, उपसचिव रंजित काकोडकर, खजिनदार ध्रुव कुमार, उपखजिनदार ज्ञानेश्वर नाईक, उदय सावर्डेकर, संतोष सावर्डेकर उपस्थित होते. मुलांना चांगल्या सोयी मिळाव्यात या दृष्टिकोनातून शारदा हायस्कूल सदोदित प्रयत्न करत आले आहे. याअगोदर हायस्कूलतर्फे विद्यार्थ्यांना मोफत गणवेष, वह्या, पुस्तके, रेनकोट, दप्तर व इतर विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे व यापुढेही हे कार्य चालू राहणार आहे. तसेच आज होणाऱया खास कार्यक्रमात हायस्कुलात याअगोदर सेवा दिलेले निवृत्त शिक्षक तसेच इतर निवृत्त कर्मचाऱयांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे, असे तुषार सावर्डेकर यांनी सांगितले.